कोपरगावात भगरीच्या पिठाचे पदार्थ खाल्ल्याने तीन जणांना विषबाधा, अन्न आणि औषध प्रशासनाकडून गंभीर दखल

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी 100 पेक्षा जास्त जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. कोपरगाव शहरात भगरीच्या पिठापासून बनविलेले पदार्थ खाल्ल्याने तीन जणांना विषबाधा झाल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. सध्या सर्व रुग्णांवर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती मिळताच अन्न आणि औषध प्रशासनाने गंभीर दखल घेऊन या घटनेबाबत कारवाई सुरू केली आहे.

शहरातील धरम कानकुबजी यांनी बाजारातून बंद पाकिटामधील भगरीचे पीठ आणून त्याचे बनवलेले पदार्थ खाताच त्याच्यासह त्याची पत्नी आणि मुलीस उलट्या-जुलाब सुरू झाले. त्यामुळे त्यांना तात्काळ शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर धरम कानकुबजी व त्यांच्या कुटुंबियांना घरी सोडण्यात आले आहे. सदर प्रकाराबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन यादव यांना विचारले असता त्यांनी भगरीतून विषबाधा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन यादव यांनी अधिक माहिती देत नागरिकांना आवाहन केले आहे. भगरीतून विषबाधा होत असल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ऐन नवरात्रीत नागरिकांनी भगरीचे तांदूळ विकत घेण्याकडे पाठ फिरवली आहे. दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सं.पा. शिंदे यांच्याशी याबाबत फोनवरून चर्चा केली असता त्यांनी नगरहून अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी रा. ना. बडे यांना सदर घटनेच्या तपासासाठी पाठविले असल्याची माहिती दिली.

अधिक माहिती देताना सहाय्यक आयुक्त शिंदे म्हणाले, अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत अनेक ठिकाणी साठे जप्त करून कारवाई करण्यात आली आहे तसेच नागरिकांना नवरात्र उपवास काळात पदार्थ तयार करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याविषयीचे प्रसिद्ध पत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडून उडाली असून महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे