गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघातांची मालिका सुरुच आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम मध्ये रविवारी सकाळी मोठा रेल्वे अपघात झाला आहे. कोरबा येथून आलेल्या कोरबा-विशाखापट्टणम एक्स्प्रेसच्या तीन एसी डब्यांना आग लागली. बघता बघता आगीने भीषण रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटास्थळी पोहोचून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या घटनेते कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र तिन्ही डब्यांमध्ये असलेले प्रवाशांचे सामान जळून राख झाले.
रेल्वेतील प्रवाशांच्या माहितीनुसार, विशाखापट्टणमच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर ही ट्रेन उभी होती. याच दरम्यान B7 डब्यातून धूर यायला लागला. ते पाहता डब्यातील प्रवाशांनी एकच गोंधळ घालत बाहेर धावले. दरम्यान त्या डब्यातून आगीचे लोट बाहेर येऊ लागले.काही वेळातच आग पसरली आणि B6 कोचलाही आग लागली. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन सकाळी साडेसहा वाजता विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर पोहोचली. ही ट्रेन 9:45 ला यार्डसाठी निघणार होती. दरम्यान, ट्रेनच्या B7 डब्यातून धूर निघू लागला आणि काही वेळातच आग जवळच्या B6 डब्यापर्यंत पोहोचली.
या घटनेनंतर मदत पथकाने शर्थीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणली आहे. आग नियंत्रणात येईपर्यंत B7, B6, M1 डबे जळून राख झाले होते. अग्निशमन जवानांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचताच आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेनंतर ही आग नेमकी कशी लागली याचा तपास सुरु आहे. सुदैवाने या दुर्घटनेवेळी ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभी होती आणि अपघातावेळी ट्रेनमध्ये प्रवासी नव्हते.
रेल्वेकडून तांत्रिक बिघाड हे अपघाताचे प्राथमिक कारण सांगण्यात आले असून या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून अहवाल तयार करण्यास सांगितले आहे. या घटनेबाबत व्होल्टेअर विभागाचे डीआरएम सौरभ प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेवेळी डबे रिकामी होते. ही ट्रेन दुरुस्ती आणि देखभालीसाठी डेपोमध्ये जाणार होती. सकाळी 11:10 वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर जळालेला डबे वगळता उर्वरित ट्रेन डेपोत पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही आग नेमकी कशी लागली याबाबत सखोल तपास करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.