सिंधू, कश्यपचा झंझावात कोरिया ओपन बॅडमिंटन

12

सामना ऑनलाईन । सेऊल

पी. व्ही. सिंधू, समीर वर्मा, बी साईप्रणीत व क्वालिफायर पारुपल्ली कश्यप या हिंदुस्थानी खेळाडूंनी आपापल्या लढती जिंकून कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुढल्या फेरीत प्रवेश केला. जागतिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केल्यानंतर प्रथम स्पर्धेत सहभागी झालेल्या पी. व्ही. सिंधूने हाँगकाँगच्या च्यूंग एनगान यी हिचा २१-१३, २१-८ असा सरळ गेममध्ये पराभव केला.

पाचव्या मानांकित सिंधूने ही लढत अवघ्या ३३ मिनिटांत जिंकली. याचबरोबर सिंधूने एगनागविरुद्धचे आपले विजयाचे रेकॉर्ड ५-० असे केले. सिंधूने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत सुरुकातीला ६-३ अशी आघाडी घेतली, मात्र च्यूंगने कडवी लढत देत ८-८ अशी बरोबरी साधण्यात यश मिळविले. मात्र मध्यांतराला सिंधूकडे ११-१० अशी निसटती आघाडी होती. त्यानंतर सिंधूने सामन्याचे चित्रच पालटवले. आक्रमक फटके खेळत सिंधूने ८ गुणांची आघाडी घेत पहिला गेम २१-१३ अशा फरकाने आपल्या खिशात घातला. दुसऱ्या गेममध्ये मात्र सिंधूने च्यूंगला सामन्यात डोकं कर काढण्याची संधी दिली नाही. सिंधूकडे सुरुवातीला ८-४ अशी आघाडी होती. मध्यंतरापर्यंत सिंधूने आपली आघाडी ११-६ अशी भक्कम केली. मध्यंतरानंतर अधिक आक्रमक होत सिंधूने दुसरा गेम २१-८ असा जिंकून सामना खिशात टाकला. पुढच्या फेरीत सिंधूची लढत गुरुकारी थायलंडच्या निकॉन जिंदपॉल हिच्याशी होणार आहे.

पी. कश्यपने चिनी तैपेईच्या सू जेन हाओचा ३५ मिनिटांच्या लढतीत २१-१३, २१-१६ असा पराभव केला. दुसऱ्या फेरीत कश्यपपुढे ‘नंबर वन’ आणि यजमान कोरियाच्या सोन वान याचे कडवे आव्हान असेल. हिंदुस्थानच्या समीर वर्माने थायलंडच्या टॅनोंगसॅक सिनसोमबुन्सुक याचा २१-१३, २१-२३, २१-९ असा पराभव केला. बी साईप्रणीतनेही पुढे पाऊल टाकले.

सौरभ, प्रणॉयला धक्का
पुरुष एकेरीत सौरभ वर्मा, व एच एस प्रणॉयला पराभवाचा धक्का बसला. तसेच सात्विक रेड्डी – अश्विनी पोनप्पा, मनू अत्री – सुमीत रेड्डी, अश्विनी पोनप्पा – सिक्की रेड्डी यांना दुहेरीत हार सहन करावी लागली. याशिवाय सात्विक रेड्डी व चिराग शेट्टी यांनी दुहेरीत विजय मिळवता आला.

आपली प्रतिक्रिया द्या