कोरिया ओपन : सिंधू, समीर उपांत्यपूर्व फेरीत

13

सामना ऑनलाईन । सेऊल

कोरियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील गुरुवारचा दिवस हिंदुस्थानी खेळाडूंसाठी समिश्र यशाचा ठरला. पी. व्ही. सिंधू आणि समीर वर्मा यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. मात्र दुसरीकडे पारुपल्ली कश्यप व साईप्रणीत यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

सिंधूने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करताना दुसऱ्या फेरीत थायलंडच्या निकॉन जिंदपॉलचा ४२ मिनिटांपर्यंत चाललेल्या चुरशीच्या लढतीत २२-२०, २१-१७ अशा दोन सरळ गेममध्ये पराभव करून आगेकूच केले. पुढच्या फेरीत सिंधूपुढे २०१४ च्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील कास्यपदक विजेत्या मिनात्सू मितानी हिचे कडवे आव्हान असेल. पहिल्या गेममध्ये सुरुवातीला पिछाडीवर पडलेल्या सिंधूने वेळीच सावरत बरोबरी साधली. अखेर जिंदपॉलची झुंज मोडून काढत सिंधूने पहिल्या गेममध्ये बाजी मारली. यानंतर दुसऱ्या गेममध्ये जिंदपॉलला डोके वर काढण्याची संधी न देता सिंधूने विजय संपादन केला.

पुरुष एकेरीत समीर वर्माने हाँगकाँगच्या वोंग किंग की क्हिन्सेटवर २१-१९, २१-१३ असा विजय मिळविला. मात्र हिंदुस्थानच्या परुपल्ली कश्यपला हाँगकाँगच्या सन कॅनकडून २१-१६, १७-२१, २१-१६ अशी हार पत्करावी लागली. सात्विक रेड्डी व चिराग शेट्टी यांनीही आगेकूच केली.

आपली प्रतिक्रिया द्या