मोबाईलवर गेम खेळताना बांगड्या मंगळसूत्र घालून अल्पवयीन मुलाची आत्महत्या

216

सामना ऑनलाईन। कोटा

राजस्थानमधील कोटा येथे मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळताना एका 12 वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. ही घटना घडली तेव्हा तो घरात एकटाच होता. आत्महत्या करतेवेळी त्याने गळ्यात मंगळसूत्र व हातात बांगड्या घातल्या होत्या. कुशल असे त्याचे नाव आहे. दरम्यान, काही दिवसांपासून तो मोबाईलवर ब्लू व्हेल सारखा गेम खेळत होता, अशी माहिती त्याच्या घरच्यांनी दिली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

ऑनलाईन गेम खेळताना एखाद्याने आत्महत्या केल्याची ही पहिलीच घटना आहे. कोटातील विज्ञान नगरमध्ये कुशल आपल्या कुटुंबीयासोबत राहत होता. शाळेला सुट्ट्या असल्याने तो दिवसभर घरात मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळायचा. सोमवारी रात्री जेवण केल्यानंतर तो त्याच्या बेडरुममध्ये झोपायला गेला. मंगळवारी सकाळी तो बेडरूममधून बाहेर न आल्याने त्याची आई त्याला उठवायला गेली. पण दरवाजा आतून बंद होता. तिने बराचवेळ दरवाजा ठोठावला पण आतून काहीही प्रतिसाद न आल्याने घरच्यांनी दरवाजा तोडला. पण आत बेडवरही कुशल नव्हता. यामुळे त्यांनी बाथरुमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण आतून दरवाजा बंद होता. त्यामुळे त्यांनी दरवाजा तोडला. पण आतले दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. कुशलचा गळफास घेतलेला मृतदेह बाथरूममध्ये लोंबकळत होता. त्याच्या हातात बांगड्या आणि गळयात मंगळसूत्र होते. त्यानंतर घरातल्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी कुशलचा मृतदेह शवविच्छेदनाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या