क्रांतिकारकांचे मुकुटमणी!

>>कौशल मुकुंदराव खडकीकर<<

सूर्याची प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकालाही हेवा वाटावा अशी कठोरता साक्षात बृहस्पतींनी शिष्यत्व पत्करावं अशी प्रगल्भता आणि या सर्वांनी धारण केलेला मानवी अवतार म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्यलढय़ात आपल्या सर्वस्वाची आहुती देऊन ज्यांनी भारतमातेच्या मुक्ततेसाठी आयुष्यभर संघर्ष केला ते क्रांतिकारकांचे मुकुटमणी, समाजसुधारक, महाकवी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.

लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा सावरकरांवर मोठा प्रभाव होता. १५ व्या वर्षी घरातील अष्टभुजादेवीसमोर ‘मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देईन’ अशी शपथ त्यांनी घेतली. ‘मित्रमेळा’ या संघटनेची स्थापन करून आपल्या राष्ट्रकार्याला सुरुवात केली. १९०१ मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर रामचंद्रराव चिपळूणकर यांची कन्या यमुनाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पुढील शिक्षणासाठी पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात आल्यावर त्यांनी ‘अभिनव भारत’ या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली.

त्यावेळी अनेक लोक उच्च शिक्षणासाठी, व्यापारासाठी किंवा पैसे कमविण्यासाठी लंडनला जात असत. मात्र ब्रिटिश सरकारचा कारभार समजून घेऊन त्यातील बारकावे तपासण्यासाठी व त्यांचा उपयोग पुन्हा हिंदुस्थानात येऊन  ब्रिटिश सत्तेला हद्दपार करण्यासाठी  १९०६ मध्ये सावरकर श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या शिष्यवृत्तीवर लंडनला पुढील शिक्षणासाठी गेले. लंडनमध्ये गेल्यानंतर त्यांनी इंडिया हाऊसमधून आपले क्रांतिकार्य चालू ठेवले. जून १९०८ मध्ये ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा आपल्या देशाच्या पहिल्या स्वातंत्र्यलढय़ाचे वर्णन करणारा महाग्रंथ त्यांनी लिहिला. हॉलंडमधून या ग्रंथाची छपाई करून नंतर त्याच्या प्रती हिंदुस्थानात वाटण्यात आल्या.

पुढे मदनलाल धिंग्रा या सावरकरांच्या सहकाऱ्याने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळय़ा घातल्या. त्यानंतर ब्रिटिश सरकारने सावरकरांना क्रांतिकारी चळवळीत सहभागी असल्यावरून अटक केली. परंतु जुलै १९०८ रोजी एस. एस. मोरिया या जहाजातून हिंदुस्थानकडे नेत असताना मार्सेलिस बंदरातून त्यांनी त्रिखंडात गाजलेली उडी मारली. मात्र किनाऱ्यावर घेण्यास येणाऱ्या सहकाऱ्यांना पोहचण्यास उशीर झाल्यामुळे सावरकर पुन्हा एकदा पकडले गेले. त्यानंतर त्यांना ब्रिटिश सरकारने दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अशी शिक्षा झालेले सावरकर हे जगातील एकमेव क्रांतिकारक होते. यावरून ब्रिटिश सरकारच्या मनात सावरकरांबद्दल असलेली भीती स्पष्टपणे दिसून येते. त्यांना नंतर अंदमानमधील सेल्युलर जेलमध्ये कैद करण्यात आले. तिथे क्रांतिकारी कैद्यांवर मोठय़ा प्रमाणात अत्याचार केले जात असत.

१९२१ मध्ये त्यांना अंदमानहून रत्नागिरीला आणण्यात आले व स्थानबद्ध करण्यात आले. तेव्हा सावरकरांनी सामाजिक सुधारणेची चळवळ हाती घेतली. अस्पृश्यता, जातीभेद यावर त्यांनी हिंदू समाजाचे प्रबोधन केले. हिंदू समाजात असलेले जातीभेदाचे प्रश्न मोडून काढण्यासाठी सावरकरांनी दलित वस्त्यांमध्ये सहभोजनाचा कार्यक्रम हाती घेतला आणि प्रभावी भाषणांमधून त्यांनी समाजातील विषमता, अनिष्ट चालीरितींवर प्रबोधन केले.

१९३७ मध्ये हिंदू महासभेच्या अध्यक्षपदी सावरकरांची निवड करण्यात आली. १९४३ पर्यंत त्यांनी हिंदू महासभेचे नेतृत्व सांभाळले. देशाची फाळणी, पाकिस्तानला दिली जाणारी मदत यांसारख्या अनेक मुद्दय़ांवर गांधीजींसोबत सावरकरांचे मतभेद होते. सावरकरांनी आयुष्यभर देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले, परंतु देश स्वतंत्र झाल्यानंतर मात्र त्यांना जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसकडून सदैव दूर ठेवण्यात आले. तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांकडून सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या थोर क्रांतिकारकांना नेहमी डावलण्यात आले.

एकदा पुण्यात एका कार्यक्रमात स्व. सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांनी सावरकरांसमोर त्यांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ या पंक्ती गाऊन दाखवल्या. त्यानंतर सावरकरांच्या आग्रहावरून त्यांनी ‘गीतरामायण’ ऐकवण्यास सुरुवात केली. तेव्हा खालील दोन पक्तींनंतर सावरकरांचे डोळे पाणावले.

“‘‘नको अश्रू ढाळू आता, पुस लोचनास,

तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास

अयोध्येत होतो राजा, रंक मी वनीचा

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’’

काय भावना दाटून आल्या असतील तेव्हा त्यांच्या मनात…? स्वातंत्र्याला ७० वर्षे होऊनदेखील हा स्वातंत्र्यवीर दुर्लक्षितच आहे. आता वेळ आहे त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्याची.

आपली प्रतिक्रिया द्या