आज गोकुळात रंग खेळतो हरी…

माधवी कुंटे

कृष्ण राधेचे प्रेम रंगांतून उमलत गेलं… बहरलं… या दोघांचे अद्वैत म्हणजे कृष्णाचा खराखुरा रंगाविष्कार!

अनुराग उत्पन्न करणाऱया फुलून आलेल्या रंगदेखण्या फुलांचं, सुगंधांचं नवीन पालवीनं दिमाखदार वैभव घेऊन येणाऱया ऋतुराज वसंताची चाहूल हुताशनी पौर्णिमेला लागते. झगमगत्या रंगांनी न्हालेल्या सृष्टीसारखा आपणही रंगोत्सव साजरा करावा हे खास हिंदुस्थानी संस्कृतीचं वैशिष्टय़! वसंतातील मदनशरांनी योगेश्वर शंकर ही विद्ध झाले. त्यांची आणि उमेची मीलनघटिका आली. तो शृंगार या रंगोत्सवात आहे तसाच राधाकृष्णाच्या ओल्या रंगक्रीडेचा शृंगारही आहे. अगदी अनंगरंगापासून भक्तीच्या परमोच्च स्थितीत भगवंतात विलीन होण्याच्या अध्यात्मरंगापर्यंत त्यांच्या नात्याच्या रंगांचा लावण्यपट प्राचीन ते अर्वाचीन सर्वकालीन कलासाहित्यात आढळून येतो. एका प्राचीन पंथानुसार शृंगारातील अनुरागाचं मूर्तिमंत रूप म्हणजे राधाकृष्ण! दोघांचेही जीवनातील सहचर वेगळे होते. पण प्रीतीची मधुरता, अल्लडपण, रागवारुसवी, विरहार्तता, शोकव्याकुळता हे सारे रंग राधाकृष्णाच्या प्रेमात होते. त्यांचं शरीर मीलन कधी झालं नाही. मनोमीलनातून निर्माण होणारे भावनारंग त्यांच्या सहवासात उतरत राहिले. तो प्रेमरंग वेगळय़ा पातळीवर टिकून राहिला. लोभस आणि हवाहवासा!

विद्वान संशोधकांच्या मते कृष्णाने गोकुळ सोडल्यावर त्याची आणि राधेची भेट फारशी झाल्याचे आढळत नाही. कृष्ण तेव्हा खूप लहान होता. शृंगारिक प्रेमाचा अर्थही त्याला ठाऊक नसावा, पण पुढे तो गोपसमूहाचा नेता झाला. त्याच्या ठायी देवत्व असल्याचा प्रत्यय गोपसमूहाला आला असावा तसा तो राधेलाही आला असावा. त्यामुळे तिने भक्तीपूर्वक आपलं सगळं काही कृष्णार्पण केलं असावं.

लोककथा आणि मिथक कथांप्रमाणे मात्र त्यांच्या प्रेमाचे सर्व रंग आढळतात. लोककवी मनमोहन यांचं ‘कसा गं बाई झाला, कुणी गं बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा’ हे गीत ‘घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा’, ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’ अशी अनेक सूचक शृंगार गीतं कवींनी लिहिली, चित्रकारांनी  त्यांचा प्रणय चित्रांकित केला तरी ती शरीरातून आत्म्यापर्यंत पोहोचण्याचं अर्थवहन करतात. राधेची भक्ती अपूर्व होती. कृष्णमय झालेल्या राधेला सर्वत्र कृष्णच भरून राहिल्याचं जाणवत होतं. कृष्णाबरोबर संसारसुख प्राप्त करणाऱया रुक्मिणीला, कृष्णावर पत्नीहक्क  बजावणाऱया मत्सरग्रस्त होऊन सारखं त्याचं लक्ष आपल्याकडे वळवणाऱया सत्यभामेला, ‘मेरे तो गिरीधर गोपाल, दूसरों न कोय’ असं म्हणून सर्वस्वाचा त्याग केला तरी कृष्णाशी पती म्हणून रममाण होण्याची आस असणाऱया मीरेला, कुणालाच राधेचं स्थान मिळालं नाही. त्या साऱया कृष्णभक्त होत्या. कृष्णाचं त्यांच्यावर प्रेम होतं, पण राधेच्या अलौकिक प्रेमाने तो सर्वस्वी तिचा झाला. तिच्याशिवाय आपण अपूर्ण, तीच आपली स्त्र्ााrशक्ती आहे हे त्याला जाणवलं.

राधा इतकी कृष्णमग्न होती की, तिच्या साऱया आशाअपेक्षा लोप पावल्या होत्या. कृष्णानं तिला गोलोकाची स्वामिनी बनवली. त्याच्या इच्छेनुसार तिने तिथली कर्तव्ये पार पाडलीही असतील, पण मनात सतत ‘मोरमुकुट, कासे पितांबर, करी मुरली’ असणारा कृष्णच होता. भगवंताचं मनमोहक रूप नजरेनं आकंठ पिताना येणारा अमृतानुभव भक्ताला हवा असतो. त्याच्या रूपाचं अखंड ध्यान करण्यासाठी द्वैत हवं असतं. तसं द्वैत राधेला हवं होतं. कृष्ण तिचा आराध्य होता. शरीराने तो जवळ नसला तरी मनात तेच रूप आणि कानात ते मुरलीचे सूर भिनलेले होते.

श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन असे नवविधा भक्तीचे रंग तिच्या भक्तीत होते. अखेर तिला कृष्णाशी सायुज्यत्व मिळालं. ती कृष्णमय आणि कृष्ण राधामय झाला. हे असं अद्वितीय युग्म जगाच्या पाठीवर एकमेव असावं म्हणून सर्वत्र राधाकृष्ण मंदिरे झाली त्या आदर्श भक्तीला भक्तांनी सदोदित प्रणिपात केला. राधामोहन भौतिक पातळीवर होळीचे रंग खेळले असतील, त्यात पर्युत्सुक प्रीती असेलही, पण अखेर कबीराच्या अध्यात्मरंगाची होळी हाच राधामोहनांचा खरा रंगोत्सव म्हणायला हवा.

 नित मंगल होरी खेलो। नित बसंत नित फाग। दया धर्म का केसर घोलो। प्रेमजीत पिचकार भाव भगती से भरी। सत गुरू तन उमंग उमंग रंग डार।

शृंगारिक मदनांकित रतिरंगापासून अध्यात्मरंगात रंगलेली ही राधाकृष्णांची होळी अद्वितीय आहे. हिंदुस्थानींच्या मनात तिचं स्थान अढळ आहे.