देव म्हणजे सकारात्मकता

262

मराठी मालिका, नाटक याबरोबरच हिंदी मालिकांमध्येही आपल्या अभिनयाची छाप टाकणारी अभिनेत्री म्हणजे आपली लाडकी क्षिती जोग. तिच्या मते इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस करण्याची गरज नाही. प्रचंड मेहनत आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वतःला तितके सक्षम बनवण्याची तयारी हाच तिच्यासाठी नवस.

देव म्हणजे – माणसातला चांगुलपणा, सकारात्मकता

आवडते दैवत – काम

धार्मिक स्थळ – घर

आवडती प्रार्थना – कराग्रे वसते लक्ष्मी

आवडतं देवाचं गाणं – ओ पालनहारे, निर्गुण और न्यारे

सध्या वाचलेलं धार्मिक साहित्य – रामायण, महाभारत

शुभ रंग – काळा, पांढरा

दैवी चमत्कारांवर विश्वास आहे का? – चमत्कारांवर विश्वास नाहीय. पण त्याच्या शक्तीवर विश्वास आहे. आपण किती श्रद्धा ठेवली पाहिजे, हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. देव मनात असला पाहिजे.

कोणती गोष्ट केल्यावर समाधान मिळते – मेडिटेशन आणि चांगलं काम.

देवावर किती विश्वास – पूर्ण विश्वास आहे. मी अनेक पुस्तके वाचली आहेत. त्यामुळे त्याची सायन्टिफिक कारणे माहित आहेत. सगळे फक्त देवाची पूजा करतात, पण त्यामागचा उद्देश माहित नसतो.

दुःखी असतेस तेव्हा – मित्र-मैत्रीणींशी फोनवर बोलते, त्यांना शेअर करते किंवा जे होते ते चांगल्यासाठी होते असा विचार करुन पुढचे काम चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते.

नास्तिक लोकांबद्दल मत – मला वाटतं जे नास्तिक असतात तेच खऱया अर्थाने आस्तिक असतात. कारण पूर्ण नास्तिक कोणी असूच शकत नाही. मूर्ती पूजनावर विश्वास नसेल पण त्याच्या दैवी शक्तीवर नक्कीच असेल.

देवभक्त असावं पण देवभोळं नसावं. तुझं मत? – अगदी बरोबर. अंधश्रद्धा आणि श्रद्धा यातला फरक ओळखता आला पाहिजे. देव आपल्याला हे करा ते करा असे सांगत नाही. त्यामुळे देवावर किती विश्वास ठेवावा हे ज्याने त्याने ओळखायला हवे.

नवस वगैरे करता का? – नाही, त्यासाठी मी प्रचंड मेहनत करते. इच्छा पूर्ण होण्यासाठी तेवढे स्वतःला सक्षम बनवण्याचा प्रयत्न करते, तोच माझ्यासाठी नवस.

उपास करतेस का? – नाही. पण जास्त पार्टी, बाहेर खाणे झाले की एक दिवस पोटाला आराम देते. त्यासाठीच मला वाटतं उपास आहे.

ज्योतिषशास्त्रावर कितपत विश्वास? – ज्योतिषशास्राविषयी फारसे माहित नाही. पण मला वाटतं हे एक शास्त्र आहे, ज्यामागे काहीतरी लॉजिक आहे आणि ते जाणून घेण्याची मला जाम उत्सुकता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या