कुडाळात कोव्हिड रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर सुरू, शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

627

कोव्हिड -19 साथरोगाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर शनिवार पासून सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कुडाळ (मुंबई – गोवा महामार्ग लगतच्या) येथील विश्रामगृह येथे हे सेंटर सुरू करण्यात आले असून कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आज फीत कापून याचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये अँटीजेन टेस्ट किटद्वारे नागरिकांची कोविड -19 टेस्ट केली जाणार आहे.

कुडाळ तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता तसेच कुडाळ मधील नागरिकांना कोविड -19 टेस्ट साठी दूरवर जावे लागू नये यासाठी कुडाळ शहरा सारख्या मुख्य ठिकाणी हे रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. त्यांना कोव्हिड टेस्ट साठी ओरोस येथे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची आरोग्य व्यवस्था आहे असे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, जि.प.माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, जि.प सदस्य अमरसेन सावंत, उपसभापती जयभारत पालव, जिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नलावडे, कुडाळ ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गौरव घुर्ये, माजी जि.प.सदस्य संजय भोगटे, संतोष शिरसाट, अतुल बंगे, वर्षा कुडाळकर, पं.स.सदस्या श्रेया परब, युवासेना जिल्हा प्रमुख  मंदार शिरसाट, नगरसेवक सचिन काळप, बाळा वेंगुर्लेकर, विभाग प्रमुख बबन बोभाटे, सरपंच नागेश आईर, युवासेना जिल्हा समन्वयक सुशिल चिंदरकर, युवासेना तालुका प्रमुख राजू जांभेकर, नगरसेविका प्रज्ञा राणे, राजू गवंडे, विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, संदीप म्हाडेश्वर, कृष्णा तेली, जीवन बांदेकर, सुयोग ढवण, बाबी गुरव, नितीन सावंत, गोट्या चव्हाण आदी उपस्थित होते.

ओरोस जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नलावडे म्हणाले, सध्या कोरोनाचा होणार फैलाव पाहता कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची, तसेच मुंबई व इतर भागातून आलेल्या व्यक्तींना तसेच कुडाळ मधील गरोदर स्त्रिया,व इतर व्यक्तींना कोरोनाची लक्षणे आढळत असल्यास त्यांची कोविड टेस्ट अँटीजेन टेस्ट किट द्वारे या सेंटर मध्ये केली जाणार आहे. तात्काळ याचा रिपोर्ट  मिळणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या