कुलदीप सेंगरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, साक्षी महाराज ट्रोल

अनेक वादग्रस्त विधानांनी सतत वाद ओढवून घेणारे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उन्नाव बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सेंगरला शुभेच्छा दिल्यामुळे साक्षी महाराज ट्रोल झाले आहेत.

भाजप खासदार साक्षी महाराज यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सेंगर याला शुभेच्छा दिल्या आहेत. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी सेंगर याच्यावर आरोपनिश्चिती करण्यात आली आहे. नोकरी मागण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सेंगर याने 4 जून 2017 रोजी बलात्कार केल्याचा आरोप होता. आपल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत पीडीत मुलीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अपदित्यनाथ यांच्या घरासमोर स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर प्रकरण उघडकीस आले होते.

एका बलात्कार प्रकरणातील आरोपीला शुभेच्छा दिल्याने नेटकऱ्यांनी साक्षी महाराजांवर आगपाखड केली आहे. तर काहींनी हैदराबाद पोलिसांना उन्नावमध्ये पाठवा, तिथेही काही असेच लोक राहतात असं म्हटलं आहे. बलात्काऱ्याची साथ देणारा बलात्काऱ्यापेक्षा कमी नसतो, असंही काहींचं म्हणणं आहे. दुसरीकडे काहींनी साक्षी महाराज यांचं समर्थनही केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या