कुलदीप जायबंदी; मायदेशी परतला, संघावर केलेली टीका कारणीभूत ठरल्याची चर्चा

आयपीएलच्या 14व्या हंगामातील दुसऱया टप्प्यात चांगली कामगिरी करत असलेल्या कोलकाता नाइट रायडर्स संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव सरावादरम्यान जायबंदी झाला असून त्याला मायदेशी पाठविण्यात आले आहे. मात्र कुलदीप यादवला खरंच दुखापत झाली आहे की त्याने काही दिवसांपूर्वी आपल्या संघावर टीका केली होती, म्हणून त्याला संघातून वगळण्यात आले असेल, याबाबतची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.

कुलदीप यादवला यूएईमध्ये सरावादरम्यान दुखापत झाली आणि आता त्याला संपूर्ण हंगामासाठी वगळण्यात आले आहे, अशी माहिती कोलकाता नाइट रायडर्सकडून देण्यात आली आहे. मात्र, कुलदीप यादवची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप कळू शकले नाही, पण तो हिंदुस्थानात परतला आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाने कुलदीप यादवला या मोसमात एकाही सामन्यात संधी दिली नाही. त्याने गेल्या मोसमातही केवळ 5 सामने खेळले होते. त्यात त्याला केवळ एक बळी मिळाला होता. 2019 च्या आयपीएलमध्येही कुलदीप यादवला 9 सामन्यांत केवळ 4 बळी मिळाले होते.

…म्हणून आयपीएल मधून वगळण्याची शक्यता

कुलदीप यादवने अलीकडेच कोलकाता नाइट रायडर्सच्या व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कुलदीप यादवला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जात नव्हती. एका मुलाखतीत त्याने यावर आपली निराशा व्यक्त केली होती. खेळाडूला संघामधून का वगळण्यात आले आहे हेदेखील त्याला माहीत नसते. जर प्रशिक्षकाने आधी तुमच्यासोबत काम केले असेल आणि तुमच्याशी दीर्घकाळ जुळले असेल, तर ते तुम्हाला अधिक चांगले समजून घेतील. पण जेव्हा संवाद कमकुवत होतो तेव्हा अनेक समस्या असतात. तुम्ही खेळत आहात का किंवा संघ तुमच्याकडून काय अपेक्षा करतो, हे तुम्हाला माहीत नसते’, असे कुलदीप यादवने माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या यू-टयूब चॅनेलवर दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. या कारणामुळे संघ व्यवस्थापनाचा कुलदीप यादववर राग होता असे बोलले जाते. त्यामुळेही त्याला आयपीएलमधून वगळले जाण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या