खातेवाटपावरून जदसेचे काँग्रेसशी मतभेद

44

सामना ऑनलाईन । बंगळुरू

मंत्र्यांचे खातेवाटप अजून झालेले नाही. खात्यांवरून काँग्रेसशी थोडे मतभेद आहेत, पण सरकार पडण्याइतपत मतभेद नाहीत असे काँग्रेस-जदसे आघाडीचे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांना त्यांच्या हायकमांडची मंजुरी मिळताच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले.

मंत्र्यांचे खातेवाटप आणि शेतकऱयांच्या कर्जमाफीच्या मुद्दय़ावर पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले की, कोणताही मुद्दा मी प्रतिष्ठेचा बनवणार नाही. प्रश्नाच्या सोडवणुकीला माझे प्राधान्य राहील, मात्र प्रतिष्ठेचा बळी देऊन पदाला चिकटून राहणे मला शक्य होणार नाही. कर्नाटकच्या सरकारमध्ये काँग्रेसचे २२ तर जदसेचे १२ मंत्री राहणार आहेत. दरम्यान, खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार यावर हायकमांडशी सल्लामसलत करण्यासाठी काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांची ‘टीम’ दिल्लीला रवाना झाली.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या आश्वासनावरून माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेस नेत्यांना विश्वासात घेऊनच पुढे जायचे असल्याने त्यांच्याशी या मुद्दय़ावर चर्चाही झालेली आहे. राज्याची आर्थिक स्थिती विचारात घ्यावी लागेल. ते मला एकटय़ाने करता येणार नाही.

– कुमारस्वामी, मुख्यमंत्री, कर्नाटक

 

आपली प्रतिक्रिया द्या