कुणाल कामराला विमान प्रवास बंदी; दिल्ली हायकोर्टाने डीजीसीएला फटकारले

810

स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या विमान प्रवासावर बंदी घालणाऱया नागरी उड्डाण महासंचालनालयाला (डीजीसीए) मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. कामरावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी त्याची तक्रार विचारात घ्यायला हवी होती. तुम्ही त्याचे म्हणणे का विचारात घेतले नाही, याचा खुलासा गुरुवारपर्यंत करा, असे निर्देश न्यायालयाने डीजीसीएला दिले आहेत.

कुणाल कामराच्या विमान प्रवासावर घातलेली बंदी मागे घेण्याबाबत एअरलाईन्सना निर्देश द्या, अशी विनंती करीत कामराचे वकील विवेक तन्खा यांनी याचिका दाखल केली आहे. नियमावलीचे उल्लंघन करून कारवाई करणाऱया एअरलाईन्सवरही कारवाई व्हावी, अशीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती नवीन चावला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. खंडपीठाने डीजीसीएच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कामराच्या विमान प्रवासावर इंडिगो एअरलाईन्सने बंदी घातल्यानंतर डीजीसीएने इतर तीन एअरलाईन्सना अशाच प्रकारची कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. डीजीसीएने हे पाऊल का उचलले, अशी विचारणा करीत न्यायमूर्ती नवीन चावला यांनी डीजीसीएला गुरुवारच्या सुनावणीवेळी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

नेमके प्रकरण काय?

कुणाल कामराने डिसेंबरमध्ये इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात पत्रकार अर्णब गोस्वामीची खिल्ली उडवली होती. त्याचा एक व्हिडीओ त्याने सोशल मीडियात पोस्ट केला होता. या प्रकारानंतर इंडिगोने कामराच्या विमान प्रवासावर सहा महिन्यांसाठी बंदी घातली. त्यानंतर नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी इतर एअरलाईन्सनाही कामरावर कारवाईची सूचना केली होती. त्यानुसार एअर इंडिया, गो एअर आणि स्पाईस जेटने पुढील सूचना मिळेपर्यंत कामराला ‘नो फ्लाईंग लिस्ट’मध्ये टाकले आहे

आपली प्रतिक्रिया द्या