कुंदन आणि लीना हाते

प्रतीक राजूरकर

नागपूर येथील कुंदन व लीना हाते यांच्या योगदानातून संवर्धन क्षेत्रात भरीव कार्य होत आहे. कुंदन हाते हे महाराष्ट्र शासनाचे नियुक्त मानद वन्य जीव संरक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर लीना झिलपे- हाते या ऐतिहासिक वस्तुसंवर्धनाच्या क्षेत्रात हिंदुस्थानातील केंद्र शासनाच्या राष्ट्रीय संशोधन संवर्धन प्रयोगशाळेच्या चार प्रमुख संशोधकांपैकी एक आहेत.

लहानपणापासून कलात्मकतेकडे ओढ असलेले कुंदन नागपूर चित्रकला महाविद्यालयातून मास्टर ऑफ फाईन आर्टस्चे पदव्युत्तर आहेत. अमरावतीतील ‘पालवी’ या मासिकाच्या मुखपृष्ठावर त्यांनी काढलेले सारस पक्ष्यांचे चित्र प्रकाशित झाले, तिथूनच त्यांचा निसर्गसंवर्धनाकडे प्रवास सुरू झाला. पुढे लहान मुलांकरिता मासिक, वर्तमानपत्रात, अपरिचित वृक्ष-पक्षी-प्राण्यांबाबत लिखाण, पक्षी निरीक्षणाकरिता जंगल भ्रमंती यातून वनखात्यात कार्यरत असलेल्यां सोबत संपर्क येऊ लागला. त्यामुळे वन कायद्याच्या उल्लंघनाच्या कायदेशीर प्रकरणात पंच म्हणून बोलावू लागले. अजय पिलारी सेठ, सुखदेवसिंग नोटे, मिश्री कोटकर यांसारख्या अधिकाऱयांकडून वन्य प्राण्यांचे स्वभाव, निवास क्षेत्र, वन कायद्यातील गुन्हे इत्यादी विषयांवर मोलाचे मार्गदर्शन प्राप्त झाले.

त्यांचे निसर्ग संवर्धनाच्या कार्यातील योगदान बघून महाराष्ट्र शासनाने त्यांची २०१२ साली मानद वन्य जीवसंरक्षक म्हणून नियुक्ती केली. अनेक अनैसर्गिक धोरणांचा विरोध करून स्वतःची संस्था अथवा रिसॉर्ट न काढता संवर्धनाला प्राधान्य दिले. त्यांना अविस्मरणीय घटना म्हणजे नागपूर जिह्यातील कोंढाळी येथे विहिरीत पडलेल्या गर्भवती वाघिणीची सुटका कुंदन यांना चटका लावून गेली. तिला बाहेर काढण्याचे कार्य वनविभागाने त्यांच्यावर सोपविले होते. तिला सुरक्षित बाहेर काढून तिच्या उपचारांवर जातीने लक्ष ठेवून तिची पुन्हा जंगलात रवानगी करण्यात आली. त्यात दुर्दैवाने वाघिणीचा गर्भपात झाला होता, पण पुनर्जन्म झाला व काही वर्षांनी त्याच वाघिणीने बछडय़ांना जन्म दिला. गर्भपात झाला, तेव्हा गर्भातील तीन बछडय़ांचे जीव गमावलेली आज ती काटलाबोडी परिसरातील प्रसिद्ध वाघीण ९ वाघांचे मातृत्व प्राप्त करू शकली ती या पुनर्जन्मातूनच. तिचे मातृत्व हेच कुंदन यांना समाधान देऊन जाते. त्यांच्या प्रयत्नांतून आज परिसरात वाघांचे संवर्धन आणि वृद्धी होऊ शकली. त्यांच्या आयुष्यात रंग भरले गेले ते चित्रकला महाविद्यालयात. तिथेच शिक्षण घेत असलेल्या लीना झिलपेंची सहचारिणी म्हणून सोबत लाभली आणि आयुष्यातील प्रवास अधिकच बहरला तो दोघांच्या संवर्धनाच्या कार्याने. लीना हाते या संग्रहालय शास्त्र, वस्तुसंवर्धन (Museology and Conservation), मानववंशशास्त्र (Anthropology), पुरातत्त्वशास्त्र संवर्धन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर आहेत व सध्या राष्ट्रीय संशोधन संवर्धन प्रयोगशाळेत नियुक्त आहेत. वर्धा जिह्यातील सेवाग्रामला गांधीजींच्या आश्रमातील वस्तूंच्या संवर्धनात, नागपूरस्थित अजब बंगला या संग्रहालयाचे व कामठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील वस्तूंचे संवर्धन लीना झिलपे यांच्या सहभागाने जतन होऊ शकले. त्या क्षेत्रातील तज्ञ म्हणून त्यांनी पुरातन वस्तुसंवर्धनासाठी सिंगापूर येथे पुरातन कपडय़ांच्या संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले आहे. आज त्या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील महत्त्वपूर्ण खात्यात त्या कार्यरत आहेत. राष्ट्रपती भवन, गोवा राज्यातील संग्रहित वस्तूंच्या संवर्धनाची जबाबदारी सांभाळत आहेत. भविष्यात वस्तुसंवर्धनाच्या माध्यमातून अनेकांना त्यांच्या कौशल्याने अनेक महान व्यक्तींच्या वस्तूंच्या दर्शनाचा लाभ मिळेल हाच त्यांचा प्रमुख उद्देश आहे. शिवाय इतिहासात पदव्युत्तर आहेतच. याव्यतिरिक्त त्यांच्या कार्याच्या प्राचीन काळासोबत येणाऱया संबंधातून त्या पाली, प्राकृत, पारसी, उर्दू, अरबी यांसारख्या भाषासुद्धा शिकल्या. कुंदन यांचे निसर्गाच्या, तर लीना यांचे निसर्गनिर्मित वस्तूंच्या संवर्धनातील कार्य पर्यावरणातून संवर्धनाकडे जाणारे आहे.