कुरघोडी

  • डॉ. विजया वाड

सासूसुनेची एकमेकींवर कुरघोडी नेहमीच सुरू असते.

दुसऱ्याचे एसेमेस वाचू नयेत हे कळत का नव्हतं सुमतीला? पण कुतूहल हो! निव्वळ कुतूहल म्हणून तिनं उल्काचा एसेमेस ती अंघोळीला गेल्यावर बघितला. ‘‘आय ऍम सिक ऍण्ड टायर्ड ऑफ दी कुजका कांदा. आय ऍम कमिंग होम विथ अभी.’’ आता ही कुजका कांदा कोणाला म्हणत्येय हे न कळण्याइतकी सुमती काही दुधखुळी नव्हती, पण मनाला भोक पडलंच. पोटात खड्डाही. सून म्हणजे कुत्र्याचं शेपूट हे मैत्रिणी म्हणायच्या ते तिला सौ टक्का सच ‘इतकं पटलं होतं. उल्का आई नि बाबांची एकुलती मुलगी होती नि अभिराम सुमती नि गोविंदरावांचा एकुलता एक मुलगा होता. दोघांनी प्रेमलग्न केलं तेव्हा उल्काची आई म्हणाली, ‘‘आमची ही एकटी एक मुलगीय, तेव्हा पंधरा दिवस तुमच्यात राहतील दोघं नि पंधरा दिवस आमच्यात राहतील. म्हणजे दोन्ही कुटुंबात आनंद.’’ म्हणजे बघा. लग्न झाल्यावर मुलीनं सासरी राहायचं हा पायंडाच ही माणसं बदलायला निघाली की! नि कितीही चांगलं वागलं तरी ही मुलगी आपल्याला कुजका कांदा म्हणते? ही टर्म ती नक्की आपल्यालाच वापरतेय… कारण गोविंदराव अजून जॉब करतात. फिरतीवर असतात नि अभीबरोबर तर तिचं गूळपीठ आहे अगदी. म्हणजे उरलं कोण? सारख्या सूचना देणारी सा नि सू… याने की सासू! सून म्हणजे ‘सू’चना ‘न’कोत ना! काही ऐकायची, शिकायची तयारीच नाही मुळी. ‘मी’ म्हणजे स्वयंभूस्त्र ! हीच भावना. उल्का अंघोळ करून येईपर्यंत सुमती पाय घसरून पडली होती नि तिनं आपली सख्खी मैत्रीण हाडवैद्य सुमित्रा खडीकरला बोलावून घेतलं होतं फोन करून. सुमती विव्हळत होती. उल्कानं अभीला अर्ध्या वाटेतून बोलावून घेतलं. ‘‘ऑफिसात जाऊ नको, तुझी आई पडलीय पाय घसरून.’’ …तर घरी कॉन्फरन्स! सुचित्रा मावशी म्हणाली, ‘‘अभी, आईला चोवीस तास अटेंडंटची गरज आहे. तिला सोडून जाऊ नको बरं बायकोच्या माहेरी पंधरा पंधरा दिवस…’’ ‘‘होय मावशी.’’ अभी असं म्हणाला तेव्हा अभीची माय सूनबाईकडे बघून हसली. स्मित हास्य हो! पण त्या मागचं ‘कशी जिरली’ हे अधोरेखित छुपं वाक्य सुनेनं सासूच्या डोळ्यात वाचलं. सासूनं सुनेचा ‘भावी’ एसेमेस जाणला. ‘कुजका कांदा धुपकन पडला नि दोन महिने अंथरूणात सडला. माझं-तुझं बॅड लक आई!’… पण सासूनं न मोडलेला पाय कुरवाळीत सख्खी मैत्रीण हाडवैद्य सुचित्रा खडीकरला डोळा घातला नि दोघी कळे न कळे हसल्या. अभी आईच्या पायावरून मायेनं हात फिरवीत होता. ‘कुरघोडी’ न कळून.