जातपंचायतीची झुंडशाही; मंदिरात प्रवेश केला म्हणून बहिष्कार; कुसापूर ग्रामस्थांची पोलिसांत तक्रार

भिवंडी तालुक्यातील कुसापूर गावात विशिष्ट जातींनाच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. अन्य जातीचे लोक मंदिरात गेले तर त्यांच्यावर बहिष्कार टाकला जात असल्याचे धक्कदायक वास्तव समोर आले आहे. जातपंचायतीच्या झुंडशाहीविरोधात कुसापूर ग्रामस्थांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

जातपंचायतीला कायद्याने बंदी असतानाही भिवंडी तालुक्यात कोयना पुनर्वसनग्रस्तांचे पुनर्वसन केलेल्या कुसापूर गावांमध्ये मात्र आजही पाटीलकी अस्तित्वात आहे. पाटीलकी विरोधात वागणाऱ्यांना बहिष्कृत केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. कोयना प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावांचे भिवंडी तालुक्यातील १३ गावांमधून पुनर्वसन करण्यात आले आहे. कुसापूर या गावात गावकीचे कासाई मानाई जानाई मंदिर आहे. या मंदिरामध्ये पूर्वपार फक्त पाटील कुटुंबीय हेच पूजा करत आले आहेत.

गावातील पाटील कुटुंबीयांव्यतिरिक्त इतर पुनर्वसनग्रस्त ग्रामस्थांना, स्त्रियांना या मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यास मनाई आहे. त्यांना कोणताही धार्मिक कार्यक्रम या मंदिरात साजरा करता येत नाही. याविरोधात गावातील ग्रामस्थ रामचंद्र शेलार यांनी आवाज उठवला आहे. मुख्यमंत्री, सामाजिक न्याय विभाग, जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेक तक्रारी करूनही न्याय न मिळाल्याने गणेशपुरी पोलीस ठाणे येथे त्यांच्यासह ग्रामस्थांनी तक्रार नोंदवली आहे. दरम्यान बहिष्कृत हा प्रकार घटनाबाह्य असून पोलिसांनी याप्रश्नी कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्हा कार्याध्यक्षा वंदना शिंदे यांनी दिली.

कायद्याविरोधात कुणी वागत असेल तर ते चुकीचे आहे. याबाबत पोलिसांकडून दखल घेण्यात आलेली आहे. सलोखा बैठक घेऊन यातून मार्ग काढला जाईल. अन्यथा जिल्हा प्रशासन याबाबत योग्य ती कारवाई करेल.
■ अभिजित खोल, तहसीलदार