कुवैत करणार कायद्यात बदल, 8 लाख हिंदुस्थानी परतू शकतात मायदेशी

1712

कोरोना व्हायरसच्या महामारी दरम्यान कुवैतने आपल्या काही कायद्यांमध्ये बदल आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जर ते बदल लागू करण्यात आले तर कुवैतमध्ये गेलेल्या 8 लाख हिंदुस्थानी नागरिकांना तो देश सोडावा लागू शकतो, अशी माहिती मिळत आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना महामारीमुळे अनेक देशांप्रमाणेच कुवैतलाही आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे येथील संसद सदस्य आणि सरकारी अधिकाऱ्यांनी परदेशातून कुवैतमध्ये नोकरीच्या निमित्ताने येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी करण्याची मागणी केली होती. त्यासाठी समितीने विधेयकात बदल करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या होत्या. कुवैतच्या राष्ट्रीय संसदेतील समितीने प्रवासी कोटा विधेयकात बदल करण्याची मंजुरी दिली आहे. या विधेयकातील बदलानुसार, कोणत्याही देशातून कुवैतमध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या कुवैतच्या एकूण लोकसंख्येच्या 15 टक्क्यांहून अधिक असता कामा नये. जर हे विधेयक मंजूर झालं तर आठ लाख हिंदुस्थानींना कुवैत सोडावा लागू शकतो.

कारण, कुवैतची एकूण लोकसंख्या 43 लाख इतकी आहे. त्यात 30 लाख इतके परदेशी नागरिक आहेत. यातील हिंदुस्थानी नागरिकांची संख्या 14.5 लाख इतकी आहे. जर हे विधेयक मंजूर झालं तर, हिंदुस्थानला 15 टक्क्यांच्या हिशोबाने आपल्या नागरिकांची संख्या 6.5 ते सात लाख इतकी ठेवावी लागेल. त्यामुळे उर्वरित 8 लाख हिंदुस्थानींना मायदेशाचा रस्ता धरावा लागू शकतो

अनेक हिंदुस्थानी कुवैतमध्ये राहून अनेक परदेशी नागरिक चांगल्या रकमेचे रेसिमेंट्स (पगाराची काही रक्कम जी कुटुंबाला पाठवली जाते) पाठवतात. तेथे नोकरी करणाऱ्या हिंदुस्थानींनाही भरभक्कम पगारामुळे उत्तम रेसिमेंट्सचा लाभ घेता येतो. मात्र, जर कुवैतने कायदे बदलले तर मात्र, या नागरिकांना मोठं आर्थिक नुकसान झेलावं लागू शकतं. हा नियम हिंदुस्थानीच नव्हे तर उर्वरित प्रवासी नागरिकांनाही लागू होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या