महाराष्ट्राच्या वाट्याचा आणखी एक प्रकल्प पळवणार?

मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रातील एकामागून एक प्रकल्प इतर राज्यांमध्ये पळवले जात आहेत. गेल्या पाच महिन्यांत अनेक प्रकल्प महाराष्ट्राने गमावले असून आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर पळवला जाणार आहे. कुवेत येथील एक कंपनी विदर्भाऐवजी मध्यप्रदेशात 26 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

टाटा-एअरबस, वेदांता फायरफॉक्स आणि सॅफ्रन ग्रुप हे मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले. आता कुवेतच्या एका कंपनीचा ‘रिफायनरी आणि फर्टिलायझर’ प्रकल्प मध्यप्रदेशात जाण्याच्या मार्गावर आहे. मध्यप्रदेशात 11 आणि 12 जानेवारी 2023 ला गुंतवणूक परिषद झाली. त्यानंतर या कंपनीने मध्यप्रदेशात 26 हजार कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. खरंतर या कंपनीचे प्रतिनिधी सहा महिन्यांपूर्वी नागपुरात आले होते. त्यावेळी विदर्भ इकानॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे तत्कालीन अध्यक्ष शिवकुमार आणि प्रदीप माहेश्वरी यांनी या प्रतिनिधींची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट घालून दिली होती. या बैठकीत कंपनीला प्रकल्पासाठी आवश्यक जमीन, वीज आणि पाणी मिळण्यात कोणतीच अडचण येणार नाही. त्यामुळे कंपनीने विदर्भात गुंतवणूक करण्याच्या विचार करावा, अशी विनंती गडकरींनी कंपनीला केली होती. मात्र मिंधे सरकारने या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला नाही.

याउलट मध्य प्रदेश सरकारने हा प्रकल्प त्यांच्या राज्यात आणण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे तो प्रकल्प मध्यप्रदेशात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्नाटक, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश देखील गुंवतणूकदारांना आकर्षित करत आहे. मात्र मिंधे सरकार याबाबत गंभीर नसल्याचे चित्र दिसत आहे. गडकरी यांनी टाटा समूहाला पत्र लिहले होते. त्या समूहाने पुढील गुंतवणुकीसाठी विदर्भाचा विचार केला जाईल, असे पत्र दिले होते. आता त्याचा पाठपुरावा करणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. परंतु, त्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.