ल. म. कडू

1288

प्रशांत गौतम

बालसाहित्याच्या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर लेखन करणाऱया आणि योगदान देणाऱया लेखकांचे साहित्य अकादमी पुरस्काराने गौरव होतात. या वर्षीच्या पुरस्कारासाठी गमभन प्रकाशनाचे प्रकाशक लेखक आणि चित्रकार ल. म. कडू यांच्या ‘खारीचा वाटा’ या पुस्तकाची निवड झाली. यापूर्वी बालसाहित्याच्या क्षेत्रात लेखन आणि योगदान दिल्याबद्दल दिलीप प्रभावळकर, अनिल अवचट, बाबा भांड, राजीव तांबे यांचा आजपर्यंत साहित्य अकादमीच्या पुरस्काराने यथोचित गौरव झाला आहे. त्यात ल. म. कडूंसारख्या लेखक, चित्रकार आणि प्रकाशक या तिन्हींचाही संगम असलेल्या लेखकाच्या लेखन प्रतिभेचा राष्ट्रीय स्तरावरील झालेला सन्मान अभिनंदनीय आहे. त्यांना मिळालेल्या सन्मानाने लहान मुलांसाठी लेखन करणाऱया ज्येष्ठ लेखकाचाही गौरव झाला आहे. खरे तर सहज, साध्या, सोप्या भाषेत मुलांसाठी लेखन करणे ही अवघड बाब आहे. मुलांचे स्वतंत्र भावविश्व असताना ज्येष्ठ मंडळी आपले अनुभव मुलांवर लादण्याचे काम करतात, त्यांना गृहीत धरतात. मुलांच्या बाबतीत घेतले जाणारे निर्णयही याच अनुभवातून पुढे येतात. म्हणूनच ते मुलांच्या जगण्याशी निगडित नसतात. मात्र कडू यांनी मुलांचे भावविश्व अचूकपणे हेरले. आधीच्या काळात आपले लेखन चित्रकलेच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचविले. याबाबतीत त्यांनी केलेले मुलांचे निरीक्षण हे पालकांसाठीही चिंतनशील आहे. याच लेखन प्रक्रियेतून त्यांची मुलांचे भावविश्व जाणणारा, प्रयोगशील लेखक, चित्रकार आणि प्रकाशक अशी ओळख निर्माण झाली. कडू यांनी शालेय वयातच लेखन आणि चित्रकलेचा प्रारंभ केला आणि तोच पुढे सर्जनाचा मार्ग स्वीकारला. पुण्यात दहा जुलै १९४७ रोजी जन्म झालेल्या कडू यांनी कळत्या वयातच लेखन आणि चित्रकलेचा छंद जोपासला. पुढील काळात आपली चित्रकला शास्त्र्ाशुद्ध व्हावी यासाठी जी.डी. आर्ट (कमर्शियल) यशस्वीरीत्या पूर्ण केले. पदवी शिक्षणाचा आणि व्यवसायाचा तसा संबंध येत नसतो. कारण पदवीधारक कितीही गुणवंत असला तरी तो त्याच्या व्यवसायामध्ये यशस्वी होईल असे सांगता येत नाही किंवा एखादा व्यावसायिक कितीही तरबेज असला तरी त्याला पदवी नसते. यामध्ये सुवर्णमध्य साधणारे आपल्या कार्यक्षेत्रात योग्य वाटचाल करतात. कडूंच्याही बाबतीत तेच झाले. गमभन प्रकाशन संस्थेची स्थापना केल्यानंतर प्रकाशन संस्थेतून प्रकाशित होणाऱया हजारो पुस्तकांची उत्तम सजावट केली. कडू यांची स्वतःची ३०  पुस्तके प्रकाशित आहेत. आजपर्यंत दोनशेच्या वर दर्जेदार पुस्तके प्रकाशन संस्थेतून प्रकाशित झाली आहेत. कडू केवळ प्रकाशकच नसून उत्तम छायाचित्रकारही आहेत. मराठी साहित्यिकांपैकी दोनशे नामांकित लेखकांची कृष्णधवल छायाचित्रे (ब्लॅक ऍण्ड व्हाईट) त्यांनी काढली. त्यांची विविध ठिकाणी प्रदर्शने भरवली. विशेषतः ६३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असो की अमृत महोत्सवी साहित्य संमेलन असो, त्या संमेलनांमध्ये कडू यांचे छायाचित्र प्रदर्शन चांगलेच लक्षवेधी ठरले. प्रकाशनातर्फे ‘साहित्य वैभव’ ही दिनदर्शिका गेल्या पंधरा वर्षांपासून प्रकाशित होते. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, प्रोत्साहन मिळावे यासाठी गमभन दिनदर्शिका गेल्या चौदा वर्षांपासून प्रकाशित होत असते. मुलांना निसर्गाचा परिचय व्हावा यादृष्टीने पानशेतजवळ सात एकर जागेवर त्यांनी ‘विद्याविहार पर्यावरण’ हा प्रकल्प सुरू केला, ज्याला हजारो मुलांनी भेट दिली. लेखन आणि चित्रकलेतील चोखंदळपणा त्यांनी प्रकाशनातही जपला. कडू यांच्या लेखनकार्याचा गौरव आजपर्यंत विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी झाला आहे. आता ‘खारीचा वाटा’ या पुस्तकाला याआधी परिवर्तन, भैरूरतन दमाणी आणि राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. आता त्याच साहित्यकृतीस बालसाहित्याचा साहित्य अकादमी पुरस्कार घोषित झाल्याने त्यांची कारकीर्द नव्याने अधोरेखित झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या