आता कोंबडी न कापताही मिळणार चिकन…वाचा सविस्तर…

कोंबडी न कापताही चिकन मिळाले तर…तसेच प्राणीहत्या न करताही मटन खाता आले तर…ही अशक्य वाटणारी गोष्ट आता प्रत्यक्षात येत आहे. सिंगापूरमध्ये आता लॅबमध्ये बनवण्यात आलेल्या मांसविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. सिंगापूरचा हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे. अमेरिकेतील ‘जस्ट ईट’ कंपनी लॅबमध्ये मांस उत्पादन करणार आहे. सिंगापूरच्या फूड एजन्सीच्या सुरक्षेच्या चाचण्यांमध्येही कंपनी यशस्वी ठरली आहे. त्यामुळे प्राणीहत्या न करताही आता चिकन आणि मटन मिळणार आहे. विशेष म्हणजे याची चवही मटन चिकनसारखीच लागणार असून पोषक घटकही मिळणार आहेत.

प्राणीहत्येमुळे पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी अनेक फर्म लॅबमध्ये कल्टीवेटेड चिकन, मटन आणि पोर्क बनवत आहेत. तसेच यामुळे प्राणीहत्या टाळता येत असून पर्यावरण रक्षणालाही हातभार लागत आहे. सध्या दररोज 13 कोटी कोंबड्या आणि 40 लाख डुकरांची हत्या करण्यात येते. त्यामुळे जैव संतुलन बिघडत असल्याचे दिसून येते.

लॅबमध्ये मांसनिर्मितीसाठी कंपनी 1200 लिटरच्या बायोरिअॅक्टरमध्ये अॅनिमल सेल्स तयार करणार आहे. त्यानंतर त्यात नवस्पती आणि झाडांचे इनग्रेडियंट मिसळण्यात येणार आहे. सुरुवातीला याचे उत्पादन मर्यादीत असेल. त्यानंतर मागणीनुसार त्यात वाढ करण्यात येणार आहे. लवकरच सिंगापूरमधील रेस्टॉरंटमध्ये अशाप्रकारचे मांस उपलब्ध होणार आहे. सुरुवातीला चिकन आणि मटनपेक्षा त्यांची किंमत जास्त असेल. मात्र, मागणी वाढून उत्पादन वाढल्यावर त्यांच्या किंमती कमी होणार असल्याचे कंपनीने सांगितले.

लॅबमध्ये मांस बनवण्यासाठी प्राण्यांच्या पेशी सेल बँकेकडून घेण्यात येणार आहेत. या पेशींच्या वाढीसाठी वनस्पती आणि झाडांमधून पोषकतत्वे घेण्यात येणार आहेत. त्यावर प्रक्रिया करून लॅबमध्ये मांस तयार होणार आहे. अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात प्राण्यांच्या मांसाचे सेवन करण्यात येते. ते आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी घातक आहे. त्यामुळे प्राणीहत्या कमी केल्यास पर्यावरण रक्षण करता येणार आहे आणि ग्लोबल वॉर्मिगची समस्याही कमी होणार असल्याचे सांगण्यात आले.

अनेकांना शाकाहार आवडत नाही. तसेच मांसाहाराचे अनेक तोटे आहेत. ते टाळण्यासाठी आमच्या उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळेल, असे कंपनीने सांगितले. तसेच याची चव आणि पोषक घटक मासांतून मिळणाऱ्या घटकांसारखेच असतील. तसेच मांसाहाराचे दुष्परिणामही होणार नाहीत, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

लॅबमध्ये अशाप्रकारचे मांस बनवण्यात अनेक आव्हाने असल्याचेही सांगण्यात आले. कमी प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी जास्त उर्जा लागणार असून कार्बनडाय ऑक्साइडचे उत्सर्जनही वाढणार आहे. मात्र, उत्पादन वाढल्यावर कार्बनडाय उत्सर्जन कमी होणार असून नैसर्गिक साधनसामग्रीचा वापरही कमी होणार आहे. तसेच नियामक संस्थाकडून मंजुरी घेण्याचे आव्हान असल्याचेही सांगण्यात आले. या उत्पादनामुळे पर्यावरण रक्षणासाठी आमचा हातभार लागत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या