गुजरात- मजुराकडून 57 वर्षांच्या महिलेवर बलात्कार आणि हत्या

6091

एका मजुराने 57 वर्षांच्या महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना गुजरातमध्ये घडली आहे. या घटनेतील आरोपीचं नाव छुटकू यादव असून तो मूळचा बिहारचा आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, बडोदा येथे 14 मे रोजी ही घटना घडली. छुटकू हा बडोदा-मुंबई एक्प्रेस वे प्रकल्पावर गेल्या काही महिन्यांपासून काम करत होता. तो राहतो त्या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या शेतात पीडिता एकटीच काम करत होती. घटनेच्या वेळी छुटकूने तिला चाकूचा धाक दाखवायला सुरुवात केली. तरीही ती ओरडतेय हे लक्षात आल्यानंतर त्याने तिच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर वार केले.

या वारांमुळे जखमी झालेल्या महिलेवर छुटकूने बलात्कार केला आणि त्यानंतर तो पसार झाला. दुसरीकडे, महिला बराच वेळ घरी न परतल्याने तिचा शोध घेण्यात आला. तेव्हा तिच्या मुलीला ती शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. तिला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे ती मृत झाल्याचं घोषित करण्यात आलं.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. तेव्हा त्यांना पीडिता सापडल्याच्या ठिकाणापासून जवळच एक रक्ताळलेला चाकू आणि मोबाईल फोन मिळाला. त्या मोबाईल फोनच्या आधारावर पोलिसांनी छुटकूला ताब्यात घेतलं. आधी उडवाउडवीची उत्तर देणाऱ्या छुटकूने पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीनंतर सत्य सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या