तरुणावर सामूहीक बलात्कार केल्याचा 4 तरुणींवर आरोप, पंजाबमधल्या घटनेने खळबळ

एका मजुराने केलेल्या आरोपामुळे पंजाबमधल्या जालंधर परिसरात खळबळ उडाली आहे. कारखान्यात काम करणाऱ्या या मजुराने आरोप केला आहे की रविवारी त्याचं अपहरण करण्यात आलं होतं. 4 तरुणींनी त्याचं अपहरण केलं होतं. आपल्याला निर्जनस्थळी नेत चौघींनी आपल्यावर आळीपाळीने बलात्कार केला असं तक्रारदाराचं म्हणणं आहे. संपूर्ण रात्र माझ्यावर या चौघींनी बलात्कार केला आणि सकाळी मला तिथेच सोडून चौघी पळून गेल्या असं या मजुराने माध्यमांना सांगितलं आहे. लाज वाटत असल्याने या मजुराने पोलिसांत तक्रार दिली नाहीये. असं असलं तरी पोलिसांनी स्वत:हून या घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली आहे.

पीडित तरुण रविवारी संध्याकाळी कामावरून घरी चालला होता. यावेळी जालंधरमधल्या लेदर कॉम्प्लेक्स रस्त्यावर एक गाडी त्याच्या बाजूला येऊन थांबली. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गाडीतील चौघींनी या तरुणाशी बोलायला सुरुवात केली. यानंतर या चौघींनी त्याला नाकावर गुंगी आणणारे औषध धरलं आणि त्याला बेशुद्ध केलं. या तरुणाला गाडीतील तरुणींनी निर्जन स्थळी नेलं त्यानंतर रात्रभर त्यांनी आपली अब्रू लुटली असं तक्रारदार तरुणाचं म्हणणं आहे.

तक्रारदार तरुणाच्या म्हणण्यानुसार चारही तरुणींचे वय हे 22 ते 23 इतके होते. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा माझ्या अंगावर एकही कपडा नव्हता आणि मला दोरीने बांधून ठेवण्यात आलं होतं असं या तक्रारदाराने म्हटलंय. जवळपास 11 ते 12 तास माझ्यावर अत्याचार होत होते असं तक्रारदाराचं म्हणणं आहे.