
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) कडाक्याच्या थंडीने कुरापतखोर चीनच्या सैन्याची बोबडी वळली आहे. हाडे गोठवणाऱ्या थंडीत उभे राहण्याची धमक नसलेल्या चिनी सैन्याने सीमेवर रोबोट तैनात केल्याची अफवा पसरवली, पण प्रत्यक्षात कुठेच त्यांचे रोबोट सैन्य दिसले नाही. त्यावर हिंदुस्थानने चीनला सीमेवर रोबोट तैनात कराच, असा सल्ला देत चिनी सैन्याच्या कुवतीची चांगलीच खिल्ली उडवली आहे.
हिंदुस्थानविरुद्ध नाना प्रकारच्या कुरापती करणाऱ्या चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ला (पीएलए) एलएसीवरील हाडे गोठवणाऱ्या थंडीत उभे राहणे मुश्कील बनले आहे. यातून हिंदुस्थानी लष्करापुढे सैन्याच्या क्षमतेचा पोकळपणा उघड झाल्यानंतर चीनने सीमेवर रोबोट सैन्य तैनात केल्याचा दावा केला; परंतु प्रत्यक्षात एलएसीवर अशा प्रकारचे शस्त्र्ाधारी रोबोट कुठेच दिसले नाहीत. चीनची हीदेखील एक प्रकारची नवी खेळी असू शकेल, असे हिंदुस्थानी लष्कराने म्हटले आहे. आम्हाला अजून तरी चीनचे रोबोट सैन्य दिसलेले नाही. पण जर त्यांना अशा प्रकारचे रोबोट तैनात करायचे असतील तर त्यांनी खुशाल रोबोटची मदत घ्यावी. चिनी सैन्य हाडे गोठवणाऱ्या थंडीत उभे राहू शकत नसल्याने त्यांना रोबोटची मदत होईल, असा सल्ला हिंदुस्थानी लष्कराने दिला आहे.
थंडीमुळे ‘माकडउडय़ा’
एलएसीवर सलग दुसऱ्या वर्षी हिवाळ्यात चिनी सैन्याला त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हिंदुस्थानच्या हद्दीत आसरा घेण्याच्या सूचना केल्या जात आहेत. हिंदुस्थानच्या सीमा भागात उणे 20 ते 40 अंश सेल्सिअस इतके तापमान असलेल्या भागात चिनी सैन्य उभे राहत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे चिनी सैनिक त्यांच्या बॅरेक्समधून खूप कमी वेळेसाठी बाहेर पडतात. थंडीत उभे राहणे मुश्कील बनत असल्याने ते लगेच बॅरेक्समध्ये परततात. चिनी सैन्याला जणू ‘माकडउडय़ा’ माराव्या लागत आहेत.
गेल्या वर्षी चिनी सैन्याला थंडीचा प्रचंड वाईट अनुभव घ्यावा लागला होता. अनेकजण आजारी पडले. त्यामुळे पीएलएने 90 टक्के सैनिकांना माघारी बोलावून त्यांच्या जागी नवे सैनिक तैनात केले होते.