महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीला फटका बसल्याने विधानसभा निवडणुकीमध्ये मते मिळवण्यासाठी मिंधे सरकार विविध योजना सुरू करत असून यात ‘लाडकी बहीण’ ही प्रमुख योजना आहे. मात्र या योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. अजित पवार गटाने दिलेल्या एका जाहिरातीनंतर मिंधे आणि अजित पवार गटामध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अजित पवार गटाने जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. तसेच त्यांच्या गुलाबी जॅकेटचीही सर्वत्र चर्चा सुरू आहे. याच दरम्यान अजित पवार गटाने लाडकी बहीण योजनेची एक जाहिरात पक्षाच्या अधिकृत सोशल मिडिया हॅण्डलवरून शेअर केली. यात मुख्यमंत्री हा शब्दही वगळ्यात आला असून बॅनरवर त्यांचा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो वापरण्यात आलेला नाही.
अजित पवार यांनीही आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून याची जाहिरात शेअर केली आहे. दादाचा वादा अशा टॅगलाईनसह ही जाहिरात शेअर करण्यात आली असून ‘अजित पवारांची लाडकी बहीण योजना’, असा जाणीवपूर्वक उल्लेख यात करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या नेत्यांना यातून वगळण्यात आलेले आहे. यामुळे मिंधे गट नाराज झाला असून दोन्ही पक्षात वाकयुद्ध रंगले आहे.
माझी बहीण होणार स्वावलंबी,
स्वतः च्या पायावर उभी राहणार!तिला बळ देण्यासाठी ‘माझी लाडकी बहीण योजना’
या योजनेच्या अधिक माहितीसाठी
खालील लिंकवर क्लिक करा.https://t.co/nwrTtsnBK2#MahaRashtrawadiHelpline#महाराष्ट्रवादी_हेल्पलाइन pic.twitter.com/Or0JeMDl82— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 3, 2024
मिंधे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी यामुळे गैरसमज निर्माण होतात असे म्हटले आहे. तसेच एखाद्या प्रस्तावाला मंत्रीमंडळ मंजुरी देत असते. त्यामुळे उत्साही कार्यकर्त्यांनी योजनेचे नाव बदलू नये, असे शिरसाट यांनी म्हटले. यानंतर अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. केंद्राच्या योजना पंतप्रधान, तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने असतात. आम्ही लाडकी बहीण योजनेचा शॉर्टफॉर्म म्हणून त्याचा वापर जाहिरातीमध्ये केला आहे. अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी ही योजना मांडली. आम्हाला श्रेय घ्यायचे असते तर त्यांनी उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नाव दिले असते, असे उमेश पाटील म्हणाले.