राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या मुख्यमंत्र्यांची ‘लाडकी बहीण’ योजनेमध्ये साताऱ्यातील एका ठकसेनाने चक्क सरकारलाच चुना लावल्याचे उघड झाले आहे. सातारा येथे राहणाऱ्या एका ठकसेनाने 30 आधारकार्डचा वापर करून आपल्या पत्नीचे वेगवेगळ्या नावाने 30 अर्ज भरले. या सर्व अर्जासाठी एकच मोबाईल क्रमांक लिंकसाठी ठेवला. प्रत्येक अर्ज भरताना ठकसेनाच्या पत्नीचे वेगवेगळी वेशभूषा केलेले फोटो चिकटवले. विशेष म्हणजे त्याने भरलेल्या 30 अजर्जापैकी 27 बँक खात्यात पैसेही जमा झाले आहेत. खारघर येथील एका महिलेने पनवेल तहसीलदारांकडे केलेल्या तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
खारघर येथे राहणाऱ्या पूजा महामुनी (27) या मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी गेल्या काही दिवसांपासून अर्ज करत होत्या. अर्जात अपेक्षित माहिती टाकण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचा अर्ज ऑनलाइन दाखल करून घेतला जात नव्हता. अर्ज सबमिट करताना पूजा यांच्या नावावर अगोदरच अर्ज स्वीकारला गेला असल्याचा मेसेज येत होता. वारंवार घडत असलेल्या या प्रकारामुळे पूजा यांनी सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यांनी पनवेल तहसील कार्यालयात सखोल चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. पूजा यांच्या आधारकार्डचा वापर करून सातारा येथील एका ठकसेनाने अगोदरच अर्ज भरला असून त्या अर्जावर त्याने त्याच्या पत्नीचा फोटो चिकटवला. त्यानंतर या भामट्याने पूजा महामुनी म्हणून त्याच्या पत्नीलाच उभे केले आणि अर्जाच्या लिंकसाठी स्वतःचा मोबाईल नंबर दिला.
30 अर्जाच्या लिंकसाठी एकच मोबाईल
ठकसेनाने मुख्यमंत्र्यांची ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे लाटण्यासाठी चक्क 30 महिलांच्या आधारकार्डाचा वापर केला. हे सर्व आधारकार्ड वेगवेगळ्या महिलांचे असले तरी त्यांच्यावर फोटो हा एकाच महिलेचा आहे. या सर्व अर्जाच्या लिंकसाठी एकच मोबाईल नंबरचा वापर करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पनवेलचे तहसीलदार संजय भालेराव यांनी याप्रकरणी तक्रार दाखल
करून घेतली आहे.
एका फोटोत साडी, दुसऱ्या फोटोत चुडीदार साताऱ्यातील ठकसेनाने वेगवेगळ्या महिलांच्या आधारकार्डच्या आधारे वेगवेगळ्या नावाने भरलेल्या अर्जासाठी एकाच महिलेचा फोटो वापरला आहे. ती महिला या ठकसेनाची बायको होती. प्रत्येक फोटोत त्याने पत्नीची वेगवेगळी वेशभूषा केलेला फोटो चिकटवला. तिने एका फोटोत साडी तर दुसऱ्या फोटोत चुडीदार परिधान केलेला आहे. काही फोटोंमध्ये डोक्यावर पदर आहे, तर काही फोटोंमध्ये ड्रेस परिधान केलेला आहे. या पद्धतीने जवळपास ३० अर्ज या ठकसेनाने भरल्याचे आतापर्यंत उघडकीस आले आहेत. त्याने याच पद्धतीने भरलेल्या अर्जाची संख्या आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त करून त्या दिशेने तपास सुरू केला आहे.