चंद्रपुरातील महिला नायजेरियन घोटाळेबाजांची साथीदार

10

सामना ऑनलाईन, अमरावती

अमरावती पोलिसांच्या सायबर सेलने व्यापाऱ्याला ६७ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी २ नायजेरियन घोटाळेबाजांना अटक केली आहे. त्यांच्यासोबतच सुकेशिनी धोटे या महिलेला देखील अटक करण्यात आली आहे. ही महिला चंद्रपुरातीलच राहणारी असून तिच्या माध्यमातून हे नायजेरियन आरोपी सावज गळाला लावत होते. पोलिसांनी सुकेशिनीचे सेंट्रल बँक ऑफ इंडीयामधील खाते सील केलं असून तिची अधिक चौकशी सध्या सुरू आहे.

हे नायजेरियन आरोपी फेसबुकवरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचे. ती स्वीकारणाऱ्या व्यक्तीची ते माहिती काढायचे. त्याच्याशी मैत्री वाढवून त्याचा उद्योग काय आहे, त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे याची देखील माहिती गोळा करायचे. सावज मालदार आहे कळाल्यानंतर हे आरोपी त्याच्याशी फोनवरून  संपर्क साधायचे. आपण कॅन्सर आणि एडस बरा करणारं अकीगबरा नावाच्या हर्बल सीडचं उत्पादन करत असून त्याची डीलरशिप तुम्हाला द्यायची आहे , यामध्ये प्रचंड फायदा असून तो हवा असेल तर तुम्हाला डीलरशिपसाठी ठराविक रक्कम तुम्हाला जमा करायची आहे असं त्या सावजाला सांगायचे. समोरच्या व्यक्तीचा विश्वास बसावा यासाठी सुकेशिनी स्वत: त्यांना भेटायला जायची. त्यानंतर हे नायजेरियन आरोपी देखील समोरच्या व्यक्तीची भेट घ्यायचे. विश्वास बसल्यावर समोरची व्यक्ती सांगेल त्या खात्यावर पैसे जमा करायची, पैसे मिळाल्यानंतर हे आरोपी जुना नंबर बंद करून फरार व्हायचे.

या टोळीने अमरावतीमधील कैलास तिवारी नावाच्या कापड व्यावसायिकाला ६७ लाखांचा गंडा घातला होता. त्याचा तपास करत असताना पोलिसांनी माईक फिलीप उर्फ बोबो उर्फ डॉकॉसमॉस, एमेका इफेसिनाची आणि सुकेशिनी उर्फ स्नेहा यांना नवी मुंबईतून अटक केली. अशाच प्रकार गोव्यामध्ये देखील उघडकीस आला असून तिथल्या एका व्यापाऱ्याला २ कोटींना गंडवलं आहे. गोव्यातील पोलिसांनी अमरावती पोलिसांशी तिथल्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी संपर्क साधला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या