पतीच्या अतिक्रमणाचा फटका पत्नीला, एकत्रित कुटुंबातील अतिक्रमणाने सरपंचपद गेले

559

सामना प्रतिनिधी, मनमाड

पतीने केलेल्या अतिक्रमणामुळे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य असलेल्या पत्नीला आपले पद गमवावे लागले. येथून जवळच असलेल्या माळेगाव कऱ्यात येथे हा प्रकार घडला. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे.

नांदगाव तालुक्यातील माळेगाव कऱ्यात ग्रामपंचायतीची निवडणूक तीन वर्षांपूर्वी झाली होती. त्यात सुनिता वाघ या वॉर्ड क्रमांक 2 (नारायणगाव) येथून निवडून आल्या. सरपंचपद हे मागासवर्ग स्त्री-राखीव असल्यामुळे वाघ या सरपंचपदी विराजमान झाल्या. परंतु त्यांचे पती दीपक वाघ यांनी मनमाड हद्दीत रेल्वेच्या जागेमध्ये अतिक्रमण करत तेथे व्यवसाय सुरू केला. या विरोधात बाळू घाडगे यांनी अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्याकडे अपील दाखल केले.

तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी वाघ यांना अभय देऊन घाडगे यांचे अपील या प्रकरणी फेटाळून लावले. मात्र अपीलकर्त्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात महसूल आयुक्तांकडे अपील दाखल केले. आयुक्तांनी अपील दाखल करून घेऊन परत मालेगाव अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीकडे पाठवले. अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून मनमाड नगरपालिकेचे म्हणणे ऐकून घेत एकत्रित कुटुंबात अतिक्रमण कायद्याचा आधार घेत वरील कारणावरून सुनिता वाघ यांना ग्रामपंचायत सदस्यपदावरून उर्वरित काळासाठी अपात्र घोषित केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या