लाफ्टर थेरपी, योगाची कमाल; धारावीचा विळखा सुटतोय! 700 रुग्ण कोरोनामुक्त

1356

धारावीत कोविड हेल्थ सेंटरमध्ये लाफ्टर थेरपी आणि योगामुळे प्रसन्न वातावरण निर्माण होत असल्यामुळे आतापर्यंत 700 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून शेकडो रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणाही होत आहे. ‘मिशन धारावी’त 26 हजारांवर कुटुंबांना घरपोच रेशन आणि 19 हजार जणांना दोन वेळचे जेवण, पौष्टिक नाश्ता दिला जात असल्यामुळे रहिवासी घरातच थांबल्याने धारावीत कोरोनाचा विळखा हळूहळू सुटू लागला आहे.

राज्यात रुग्ण डबल होण्याचा दर 14 दिवस असताना धारावीचा डबलिंग रेट 25 दिवस आहे. तसेच इतर वॉर्डमध्ये प्रतिदिवस रुग्णवाढ 4 ते 9 टक्क्यांपर्यंत असताना धारावीत मात्र प्रतिदिन सर्वात कमी 2.6 टक्के रुग्ण वाढत आहेत. धारावीत रुग्णसंख्या 1675 पर्यंत गेली असून 70 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आशियातील सर्वात मोठ्या दाटीवाटीच्या धारावी झोपडपट्टीत रुग्णसंख्या वाढू लागल्याने पालिकेने ‘मिशन धारावी’ सुरू केले आहे. यामध्ये सुमारे अडीच हजार हेल्थकेअर वर्कर्स काम करीत आहेत. याशिवाय 27 खासगी डॉक्टर, 29 नर्स, 68 वॉर्ड बॉय, 11 सहायक आणि 2 फार्मासिस्ट काम करीत असल्याची माहिती जी नॉर्थ वॉर्डचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

जनजागृतीसाठी एक खास व्हॅन ठेवण्यात आली असून रहिवासी लक्षणे असल्यास स्वत:हून समोर येत आहेत. दाटीवाटीची लोकवस्ती असली तरी दिवसातून चार ते पाच वेळा सार्वजनिक शौचालये निर्जंतूक करण्यात येत आहेत. धारावीत प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रहिवाशांना सोयीसुविधा, रुग्णांसाठी उपलब्ध असणारी पोर्टेबल ऑक्सिजन सुविधा, प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मल्टी व्हिटॅमिन आणि लक्षणांनुसार केले जाणारे दर्जेदार उपचार यामुळे कोरोना आटोक्यात येत असल्याचेही दिघावकर यांनी सांगितले.

मुस्लीम बांधवांसाठी इफ्तार पॅकेट
कोरोनाच्या प्रभावातच रमजान आल्यामुळे गर्दी कशी टाळणार असा प्रश्न होता. मात्र पालिकेच्या माध्यमातून रमजान काळात मुस्लीम बांधवांना 11 हजार इफ्तार पॅकेट्स वाटण्यात आली. या शिवाय कोविड-क्वारंटाइन सेंटरवर उपवास सोडण्यासाठी सायंकाळी 5 वाजता ज्यूस, फ्रुट पॅकेटही वाटण्यात आली. यामुळे धारावीत मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव असतानाही एकही तक्रार आली नाही.

डिस्चार्ज रेट सर्वाधिक
धारावीत रुग्णसंख्येच्या तुलनेत डिस्चार्ज होण्याचे प्रमाण 42 टक्के आहे. हे प्रमाण संपूर्ण जी-नॉर्थ विभागात 37 टक्के, एकूण मुंबईत 27 टक्के आणि महाराष्ट्रात 30 टक्के आहे. म्हणजेत धारावीत रुग्ण बरे होऊन डिस्चार्ज होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या