लगोरी पेशवाईच्या काळातील खेळ

बाळ तोरसकर

लगोरी… या खेळाची पाळेमुळे थेट पेशवाईत जातात….

मागच्या लेखात आपण जसे पाहिले की, लहान मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी वेगवेगळे खेळ जन्माला आले. त्यातूनच पुढे आलेला आणखी एक खेळ म्हणजे लगोरी. या खेळाची पाळेमुळे संत एकनाथांच्या गाथेत आढळतात. पेशवाईच्या काळातही हा खेळ खेळत असल्याचे दाखले सापडतात. खरंतर आपल्या मातीतील हा एक अतिशय चपळ व बुद्धिमतेला आव्हान देणारा खेळ आहे. लगोरी हा महाराष्ट्रासहित संपूर्ण हिंदुस्थानात खेळला जाणारा एक पारंपरिक खेळ असला तरी हवा तेवढा तो फोफावलेला नाही. तरी हा खेळ जवळ जवळ सर्वच जण ओळखतात व लहानपणी बऱ्याच जणांनी हा खेळ खेळला असेल. कै. संतोष गुरव यांनी या खेळाला वेगळी ओळख मिळवून दिली.

पूर्वी लगोरीसाठी वापरल्या जाणाऱ्या चकत्या या फरशी किंवा दगडी कपऱ्यांच्या असत. आता मात्र या चकत्या गोल लाकडी ठोकळय़ाच्या असतात. याच लाकडी गोल ठोकळय़ांना लगोरी असे म्हणतात. या आधुनिक काळात मात्र खालून वर निमुळत्या (मंदिराच्या शिखराप्रमाणे) व गोल (वर्तुळाकार) आकाराच्या वेगवेगळय़ा नऊ रंगातील लाकडी चकत्या असलेला संच बाजारात मिळतो. या लगोऱ्यांचा संच फोडण्यासाठी टेनिस चेंडू वापरला केला जातो. हा खेळ खेळण्यासाठी लगोरीचा संच व चेंडू असेल तर कुठेही व केंव्हाही हा खेळ खेळता येतो. छोटे मैदानसुद्धा यासाठी चालते. खेळाचा मुख्य उद्देश हा लगोरी फोडणे व ती पुन्हा रचणे हा असतो. लगोरी या खेळासाठी ८१ बाय ४५ फूट आकाराचे मैदान वापरले जाते. या खेळात एका सामन्यात दोन संघ खेळतात. प्रत्येक संघात १५ खेळाडू असतात व बारा खेळाडू सामन्यात उतरतात. त्यापैकी सहा खेळाडू प्रत्यक्ष मैदानात तर उरलेले सहा खेळाडू मैदानाबाहेरील चेंडू आत देण्यासाठी असतात तर उरलेले तीन खेळाडू राखीव असतात.

या खेळात सहा (३ + ३) मिनिटांच्या एका डावात प्रत्येक संघाला एक आक्रमण व एक संरक्षण करण्याची संधी मिळते व दोन डाव मिळून एक सामना होतो. आक्रमण करणाऱ्या संघातील प्रत्येक खेळाडूला लगोरी फोडण्याची संधी दिली जाते व जर लगोरी पहिल्या प्रयत्नात फुटली नाही तर त्याला अजून दोन म्हणजे एकूण तीन संधी प्रत्येकाला दिली जाते. त्याचवेळी प्रतिस्पर्धी म्हणजेच संरक्षण करणाऱ्या संघातील खेळाडू क्षेत्ररक्षक म्हणून आक्रमकचा व लगोरी रचणाऱ्या इतर खेळाडूंचा अंदाज घेत मैदानात लगोरीच्या मागे उभे असतात. लगोरी फोडणाऱ्या संघातील इतर खेळाडू हे फुटलेली लगोरी रचतात व त्याचवेळी संरक्षण करणाऱ्या संघातील खेळाडू लगोरी रचणाऱ्या संघातील खेळाडूस चेंडू मारून बाद करण्याचा प्रयत्न करत असतात. जर लगोरी फोडणाऱ्या खेळाडूने चेंडू फेकल्यावर व टप्पा पडून उडल्यावर जर संरक्षण करणाऱ्या संघातील खेळाडूने तो चेंडू झेलला तर मात्र लगोरी फोडणारा हा खेळाडू बाद होतो व त्याला पुन्हा संधी नसते.

एकदा का लगोरी फुटली की, लगोरी फोडणाऱ्या संघातील सर्व खेळाडू ही लगोरी पुन्हा एकावर एक रचण्याचे काम करतात. त्याचवेळी संरक्षण करणाऱ्या संघातील खेळाडू त्याच चेंडूने लगोरी रचणाऱ्या संघातील खेळाडूस चेंडू मारून बाद करतात व जर चेंडू लगोरी रचणाऱ्या संघातील कोणत्याही खेळाडूस लागला तर मात्र तो संघ बाद होतो. आक्रमक संघाने जर संपूर्ण लगोरी लावली व ती जाहीर केली तर त्या संघाला दहा गुण मिळतात. जर संपूर्ण लगोरी लावण्याआधी संरक्षण करणाऱ्या संघाने आक्रमक संघातील खेळाडूला बाद केले तर जेवढय़ा लगोऱ्या लावल्या असतील तेवढे गुण संघाला मिळतात व त्याचवेळी संरक्षक संघाला ५ गुण मिळतात म्हणजेच आक्रमक संघाचे ५ गुण वजा होतात. त्यामुळे सामना कधी कधी वजा गुणांमध्ये सुद्धा चालतो. जर संपूर्ण सामना (दोन डाव) बरोबरीत सुटला तर हा सामना तिसऱ्या डावात खेळवला जातो व त्यानंतरही सामना बरोबरीत राहिला तर मात्र गोल्डन हिट दिली जाते. यासाठी दोन्ही संघांना ५-५ संधी लगोरी फोडण्यासाठी दिली जाते व सामन्याचा निकाल लावला जातो. तसेच या खेळावर नियंत्रण ठेवण्यासाठी चार पंच असतात. त्यातील दोन पंच, एक गुलेखक व एक वेळाधिकारी असतो व दोन लाइनमन असतात.

जर आपल्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या असतील तर आपल्याला आठवत असेल की आपण कुठेही दगडी कपऱ्या घेऊन हा खेळ गल्ली बोळात सुद्धा खेळला असेल तर चला पुन्हा एकदा लहाणग्यांना लगोरी खेळायला लावूया.

-baltoraskar@gmail.com