‘सुरंगा’ने लावला हिंदुस्थानी फलंदाजीला सुरुंग

सामना ऑनलाईन । कोलकाता

हिंदुस्थान-श्रीलंका कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीला आज (गुरुवारी) कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर सुरुवात झाली. पावसाचा व्यत्यय आणि अपुरा प्रकाश यामुळे पहिल्या दिवशी केवळ ११.५ षटकांचा खेळ झाला. हिंदुस्थानने ३ गडी गमावून फक्त १७ धावा केल्या. या दरम्यान श्रीलंकेच्या सुरंगा लकमल याने नव्या विक्रमाला गवसणी घातली. आपल्या ६ षटकांच्या स्पेलमध्ये एकही धाव न देता त्याने हिंदुस्थानच्या तीन आघाडीच्या फलंदाजांना बाद केले. सुरंगा लकमलच्याआधी ऑस्ट्रेलियाच्या रिची बॅनोने असा पराक्रम केला होता.

रिची बॅनोने १९५९ मध्ये दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात दिवसाअखेर निर्धाव गोलंदाजी करत तीन बळी मिळवले होते. तब्बल ५८ वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानात लकमलने त्या घटनेची आठवण ताजी करुन दिली. लकमलने सलामीवीर लोकेश राहुल, शिखर धवन या जोडीसह कर्णधार विराट कोहलीला तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला त्यावेळी चेतेश्वर पुजारा (०८) तर अजिंक्य रहाणे (०) धावांवर खेळत होते.

सुरंगा लकमलने २०१० मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत ४० कसोटी सामने खेळले असून, ७१ डावात ९१ बळी मिळवले आहेत. ६७ एकदिवसीय सामन्यात त्याने ९० बळी टिपले आहेत. टी-२० सामन्यातील ९ सामन्यात त्याने सात बळी मिळवले आहेत.

घटनाक्रम –

पाऊस आणि अपुरा प्रकाश यामुळे खेळ थांबवला
हिंदुस्थान ११.५ षटकांत ३ बाद १७ धावा
श्रीलंकेचा गोलंदाज सुरंगा लकमलने सहा षटकांत शून्य धावा देत घेतले ३ बळी
कर्णधार विराट कोहली शून्य धावा करुन बाद
शिखर धवन आठ धावा करुन बाद
के एल राहुल शून्यावर बाद
नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा गोलंदाजीचा निर्णय

आपली प्रतिक्रिया द्या