लालमहालावरील सर्जिकल स्ट्राइक

893

>>मिलिंद र. एकबोटे

शाहिस्तेखानावरील हल्ला म्हणजे शिवशाहीतील सर्जिकल स्ट्राइकच! आज चैत्र शुद्ध अष्टमीनिमित्त पुण्यातील शिवभक्त मंडळी लालमहालात शिवतेजदिन साजरा करीत आहेत. छत्रपती शिवरायांच्या या साहसी आणि अत्यंत नियोजनबद्ध यशस्वी आक्रमणाचे हे पुण्यस्मरण.

अफझलखानवधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. सिद्धी जौहरच्या वेढ्यातून ते बाहेर पडण्यात यशस्वी झाले, पण शाहिस्तेखानाचे संकट उभे राहिले. त्याने प्रथम चाकणच्या संग्रामदुर्गवर हल्ला चढवला. अपुऱ्या सैन्यानिशी मराठय़ांनी त्याच्याशी निकराचा संघर्ष केला; परंतु ५५ दिवसांच्या संघर्षानंतर संग्रामदुर्ग मोगलांच्या ताब्यात गेला. चाकणपासून पुण्यापर्यंत खानाच्या विशाल फौजेचा वेढा पडला होता आणि त्यामध्ये स्वराज्यातील रयत भरडून निघत होती. भोर, रोहिड्याच्या परिसरातसुद्धा शाहिस्तेखानाचे सैनिक धुमाकूळ घालत होते. या सर्व घटनांचा महाराज विचार करत होते. राजगडावर आपल्या विश्वासू मंडळींबरोबर त्यांनी विचारविनिमय करून योजना पक्की केली. रामनवमीच्या आदल्या दिवशी अर्थात चैत्र शुद्ध अष्टमीला लालमहालावर हल्ला करण्याचे निश्चित ठरले.

ते दिवस मोगलांसाठी रमजानचे होते. त्या दिवशी सहावा चंद्र होता. रमजानच्या दिवसांत रात्री मोगल सैनिक खाऊन पिऊन सुस्तपणे झोपलेले असत. शिवाय तो दिवस बादशहाच्या राज्यारोहणाच्या वाढदिवसानिमित्त साजऱ्या होणाऱ्या दिवसांपैकी होता. त्या दिवशी प्रत्येक प्रहरी नौबती वाजवण्याचा मोगली प्रघात होता. या सर्व गोष्टींचा फायदा घेण्याची व्यूहरचना महाराजांनी आखली होती. महाराज शत्रूचा धर्म जाणत नव्हते, तर शत्रुत्वाचा धर्म पाळत होते हे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे.

पुण्याजवळच्या अंबिल ओढ्यापर्यंत राजगडवरून सिंहगडमार्गे महाराज आपल्या निवडक तीन हजार सैन्यनिशी घोड्यावरून आले. त्यांच्याबरोबर नेताजी पालकर, चिमणाजी व बाबाजी देशपांडे बंधू, कोयाजी बांदल, येसाजी कंक, सर्जेराव जेधे, चांदनी जेधे, तानाजी मालुसरे इ. विश्वासू मंडळी होती. देशपांडे बंधू महाराजांचे बालमित्र होते. त्यांना लालमहालाची खडा न् खडा माहिती होती. लालमहालात बालपणी ते महाराजांबरोबर वावरले होते, खेळले होते म्हणून महाराजांनी त्यांना बरोबर घेतले होते. त्यांचा या प्रसंगात चांगला उपयोग झाला. या देशपांडे बंधूंच्या नेतृत्वाखाली लालमहालात घुसण्याची जबाबदारी असणारे पथक देण्यात आले होते. आंबिल ओढय़ापासून निवडक ४०० जणांना घेऊन महाराज पायीच निघाले. अर्थात सावधगिरी म्हणून चिलखत आणि जिरेटोप होताच! पुण्यात शिरताना ठिकठिकाणी त्यांची चौकशी झाली. परंतु सैनिकांच्या बदलीची वेळ अचूक पाळल्याने महाराजांचे  सैनिक बेमालूपणे लालमहालापर्यंत पोहोचू शकले. खानाचे प्रचंड सैन्य होते आणि व्यवस्थापन ढिसाळ होते. त्यामुळे महाराजांच्या सैनिकांची चौकशी व्हायची तेव्हा बाबाजी व चिमणाजी उत्तर द्यायचे, ‘आम्ही कटकातील लोक आहोत. चौकी पहाऱ्यास गेलो होतो.’ या उत्तराने पहारेऱयांचे शंकानिरसन होई. त्यामुळे लालमहालापर्यंत पहाटे ३ पर्यंत पोहोचल्यावर मुदपाकखान्याकडे ही मंडळी पोहोचली. त्या ठिकाणी आचारी मंडळींचे काम सुरू झाले होते. मुदपाकखाना व खानाचा जनानखाना याच्यामध्ये असलेली एक दिंडी बुजवण्यात आली होती. ती दिंडी मोकळी करूनच खानापर्यंत पोहोचणे शक्य होते. त्यामुळे सर्व आचाऱयांना कापून काढण्याशिवाय पर्याय नव्हता. एखादा आचारी सावध झाला आणि ओरडला तर सगळीच पंचाईत होण्याची शक्यता होती. थोड्यात वेळात या आचाऱ्यांना यमसदनाला पाठवून महाराजांच्या सैनिकांनी दिंडी मोकळी करून जनानखान्यात प्रवेश करून खानाचा शोध घेण्यास सुरुवात केली. खानाच्या बायकांनी सर्व समया विझवून टाकल्यामुळे सर्वत्र अंधार झाला. या अंधाराचा फायदा घेऊन खान दोन बायकांच्या मागे लपला होता. महाराजांनी त्याला शोधून काढून त्याच्यावर अत्यंत त्वेषाने हल्ला केला. त्याच्या उजव्या हाताची तीन बोटे उडाली आणि अंधारात महाराजांना खानाची गर्दन उडाल्याचा भास झाला. अशाप्रकारे खानावरील हल्ला झाल्यावर महाराजांनी पटापट सैनिकांना मोहीम आटोपण्याचे आदेश दिले. महाराज व त्यांचे सैनिक लालमहालातून सुरक्षितपणे निसटले. नदीपलीकडे सर्जेराव जेधे व चांदजी जेधे हे दोन्ही कान्होजी पुत्र रोकडोबा मंदिराजवळ महाराजांसाठी घोडे घेऊन थांबले होते. तेथून महाराज वारजेमार्गे सिंहगडला वळसा घालून राजगडाकडे रवाना झाले. याचवेळी महाराजांनी कात्रजच्या घाटात बैलांच्या शिंगांना पालते बांधून त्यांना पळवले आणि मोगलांची फसवणूक केली. तेवढ्या वेळात महाराज सुरक्षितपणे राजगडावर पोहोचले होते. महाराजांचा हा गनिमी कावा जगप्रसिद्ध असून त्याचा वापर आजही युद्धामध्ये केला जातो. याप्रसंगी कोयाजी बांदेल जखमी झाले. महाराजांनी त्यांना त्यांच्या पराक्रमासाठी आलंदे गाव इनाम दिले.

इकडे लालमहालात गोंधळ माजला. खानाचा आवडता मुलगा अबुल हसन वडिलांचा बचाव करताना मारला गेला. खानाची एकूण ५५ माणसे मारली गेली. शाहिस्तेखान इतका धास्तावला होता की त्याने आपल्या बोटांवर मलमपट्टी करायला हकीमसुद्धा बोलावला नाही. त्याला अशी भीती वाटत होती की हकिमाच्या वेषात शिवरायच पुन्हा येऊन आपली गर्दन उडवतील. या घटनेमध्ये शिवरायांचे साहस, निर्भयता, अचूक नियोजन कौशल्य, प्रजेविषयीची कळकळ आणि ईश्वराविषयी समर्पित भावना स्पष्टपणे दिसते. दोन-तीन दिवसांतच शाहिस्तेखान पुण्यातून औरंगाबादेस गेला. तिथून त्याला आसामच्या सुभेदारीवर पाठवण्यात आले. अशाप्रकारे शाहिस्तेखानाची फजिती आणि नाचक्की झाली.

चार महिन्यांपूर्वी हिंदुस्थानी लष्कराने सर्जिकल स्ट्राइक करून पाकव्याप्त कश्मीरमध्ये खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी प्रत्येक हिंदुस्थानीयांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. परंतु त्या सर्जिकल स्ट्राइकची प्रेरणा कदाचित लालमहालावरील यशस्वी आक्रमणाच्या घटनेत दडली असावी.

आपली प्रतिक्रिया द्या