लालबागचा बेसबॉल चॅम्प.. नंदन परब

614

नवनाथ दांडेकर

बालमित्रांनो, आपण आतापर्यंत हिंदुस्थानी क्रीडाशौकिनांत लोकप्रिय असलेल्या खेळांत प्रावीण्य मिळवणाऱ्या ‘स्टार’ खेळाडूंची माहिती घेतली. आज आपल्याला जाणून घ्यायचेय ते युरोप, अमेरिका खंडासह जपान, चीन या आशियाई देशात लोकप्रिय असलेल्या बेसबॉल खेळात प्रावीण्य मिळवणाऱया मुंबईकर खेळाडूला. लालबागसारख्या कामगार विभागात राहून बेसबॉलचे कौशल्य अवगत करणाऱ्या या आपल्या दादाचे नाव आहे नंदन विजय परब. लालबागच्या तावरीपाडा मध्यमवर्गीय भागात राहून बेसबॉल या अमेरिकन खेळाचे कसब नंदनने दादरच्या बालमोहन विद्यामंदिरमध्ये शिकतानाच मिळवले. आता तो जिल्हा, राष्ट्रीय स्तरावरून मजल मारत थेट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याची इस्लामाबाद येथे होणाऱया दक्षिण आशियाई (सार्क) बेसबॉल कप स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघात निवड झाली आहे.

बेसबॉल हा तसा क्रिकेटसारखाच बॅट आणि बॉलचा खेळ. पण क्रिकेटपेक्षा याचे नियम अगदीच वेगळे. उत्तर अमेरिकेत उगम पावलेला हा ९ खेळाडूंचा खेळ अमेरिका व युरोपमध्ये तुफान लोकप्रिय झालाय. आपल्याला तो टीव्ही चॅनेल्सवरून बहुधा पहायला मिळतो. पण मुंबईसारख्या क्रिकेट पंढरीत राहून नंदनने क्रिकेटऐवजी बेसबॉलची बॅट हातात घेतली ती बालमोहनचे क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र इखणकर व पावसकर यांच्यामुळे. या दोघांनीही नंदनमधील क्रीडानैपुण्य ओळखून त्याला बेसबॉलचे उत्तम धडे दिले. त्यानंतर शालेय स्पर्धेत नंदनने आपल्या शाळेसाठी व नंतर मुंबई जिल्हय़ासाठी अनेक गौरवाचे क्षण आणले. वयाच्या १४ व्या वर्षीच तो मुंबई जिल्हा बेसबॉल संघाचा कर्णधार झाला. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेत १५ वेळा मुंबईचे आणि राष्ट्रीय स्पर्धेत १० वेळा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत नंदनने राज्याचे नाव उज्ज्वल केले. हे सर्व करताना त्याने अभ्यासातही तेवढेच यश मिळवत एसएससीला ८९ टक्के तर एचएससीला (१२वी) ७२ टक्के गुण मिळवत आपल्या परिश्रमांना यशाचे कोंदण चढवले.

रुपारेल कॉलेजने दिले कारकीर्दीला नवे वळण

मुंबईच्या डी.जी. रुपारेल कॉलेजमध्ये शिकताना नंदनच्या बेसबॉल कारकीर्दीला यशाची नवी उंची लाभली. त्याने आंतरविद्यापीठ बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे यशस्वी नेतृत्व करताना राज्याला यश मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. राष्ट्रीय स्पधेंत बेस्ट बॅटरचा बहुमान मिळवत नंदनने आपण ‘बेसबॉल चॅम्प’ असल्याचे अनेकदा सिद्ध केलेय.

आता देशाचे नाव उज्ज्वल करायचेय

बेसबॉल या आगळ्यावेगळ्या खेळात प्रावीण्य मिळवणाऱ्या नंदनला आता आंतरराष्ट्रीय बेसबॉलमध्ये हिंदुस्थानचे नाव उज्ज्वल करायचेय. या फेबुवारीत होणाऱ्या इस्लामाबादेतील सार्क या बेसबॉल स्पर्धेने त्याचा आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रवास सुरू होणार आहे. त्याच्या पाठीशी त्याचे भाऊ सिद्धेश परब व स्वप्नील परब खंबीरपणे उभे आहेत. जिगरबाज नंदन आंतरराष्ट्रीय बेसबॉलमध्ये देशाचे नाव नक्कीच रोशन करील असा दृढ विश्वास त्या दोघांनी व्यक्त केलाय. आपणही या मुंबईकर बेसबॉल चॅम्पच्या यशस्वी वाटचालीसाठी पुन्हा लाख लाख शुभेच्छा द्यायला हरकत नाही.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या