मोदींविरोधात लालू काढणार महारॅली…राहुल,ममता आणि मुलायम सहभागी होणार

सामना ऑनलाईन। पाटणा

नोटाबंदीच्या विरोधात विरोधकांनी एकत्र येत मोदींविरोधातील आवाज आणखी बुलंद करण्याचं ठरवलंय. मोदींविरोधात लालू प्रसाद यादव यांनी पाटण्याला एका महारॅलीचं आयोजन केलं आहे. या महा रॅलीमध्ये राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि मुलायमसिंह यादव देखील सहभागी होणार आहेत.

laloo

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात सर्वसामान्य माणसाला प्रचंड त्रास होतोय. बँकांबाहेरच्या रांगा अजूनही कमी झालेल्या नाहीयेत. रोज नवनव्या नियमांमुळे आणि आदेशांमुळे गोंधळ वाढत चाललेला आहे. ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १ हजारच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानंतर बँकेत पैसे भरण्यासाठी, पैसे काढण्यासाठी निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे लोकांच्या हालअपेष्टांमध्ये दिवसेंदिवस भर पडत गेली. नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार थांबेल, दहशतवाद थांबेल असं सांगण्यात आलं होतं. मात्र दोन्ही गोष्टी निर्णयानंतरही थांबल्या नाहीत. देशभरात मोठ्या प्रमाणात जुन्या आणि नव्या नोटा सापडतायत. बँक कर्मचारी, घोटाळेबाजांनी कमिशन घेऊन नोटा बदलून दिल्या , आणि आजही हे प्रकार सुरू असल्याचं कळतंय.

आत्तापर्यंत मोदींना घेरण्यासाठी मुद्दे शोधत असलेल्या विरोधकांना नोटाबंदीमुळे जबरस्त असा मुद्दा मिळाला आहे. लालू प्रसाद यादव यांनी एका हिंदी वाहिनीशी बोलताना सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी ५० दिवस द्या असं आवाहन केलं होतं. हे ५० दिवस संपत आले तरी लोकांचा त्रास कमी झालेला नाहीये. त्यामुळे आता लोकांनी मोदींकडून उत्तर मागणं गरजेचं आहे. लोकांना झालेल्या त्रासाबद्दल मोदींनी राजीनामा द्यायला पाहीजे असं राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी म्हटलंय.