लाळ्याखुरकूत व लम्पी स्कीन रोगामुळे पशुधन धोक्‍यात, जनावरे बाजार बंद

लाळखुरकूत तसेच लंम्पी या साथ रोगाचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याने सोमवारी होणारा जनावरे बाजार खबरदारी म्हणून पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आला आहे, अशी माहिती सचिव नानासाहेब रणशूर यांनी दिली.

जनावरांतील लाळ्या खुरकूत रोग व लम्पी स्कीन (एलएसडी) या संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू नये. याकरता खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी सर्व बाजार समित्यांना जनावरांचा बाजार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशान्वये कोपरगाव येथील सोमवारचा जनावरे बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे.

लाळ्या खुरकूत रोग व लम्पी स्कीन

हा रोग झालेल्या जनावरांना सुरवातीला ताप येत असून तोंडामध्ये फोड आल्याने खात येत नाही. तसेच पायाच्या नखांना जखम होते. जनावरांनी खाण्याचे बंद केल्यास जनावराची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. यामुळे जनावरे दगाविण्याचे प्रमाण वाढते. या दोन्ही रोगामुळे दुभती जनावरे संकटात आहेत. रोग संसर्गजन्य असल्याने वेगाने फैलावणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडे संख्याबळ कमी असल्याने शेतकऱ्यांना शासकीय पुशवैद्यकीय डॉक्टरकडून वेळेवरती उपचार मिळत नसल्याने शेतकरी हतबल होतात. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरता खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे जनावरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता असल्याने जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या