गुजरातचे लॅण्डमाफिया कोकणात सक्रीय, खासदार विनायक राऊत यांचा गौप्यस्फोट

36

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

प्रस्तावित पेट्रोकेमिकल रिफायनरीच्या परिसरातील २ हजार एकर क्षेत्रापेक्षा अधिक जागा ही जैन व्यक्तींच्या नावावर आढळून आली आहे. यावरुन गुजरातचे लॅण्डमाफिया नाणार रिफायनरी परिसरात सक्रीय झाले असल्याचा आरोप शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

नाणार येथे होणाऱ्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे. शिवसेना या प्रकल्पाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, गेल्या तीन वर्षात कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पांबाबत आम्ही सावध आहोत. विनाशकारी प्रकल्पांना आमचा ठाम विरोध आहे. कोकणात पेपर मिल आणण्यासाठी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी खूप प्रयत्न केले परंतु काही कारणास्तव हा प्रकल्प रखडला. खेडमध्ये रेल्वेचे कोच बनवण्याच्या प्रकल्पाचे भूमीपुजन झाले आहे. हा प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी आम्ही प्रयत्नील आहोत. तसेच रेल्वेमार्ग आणि बंदरे जोडण्याचा प्रकल्पही पूर्ण करण्यासाठी आमची धडपड आहे. कोकणामध्ये विनाशकारी आणि प्रदुषणकारी प्रकल्प नकोत, ही शिवसेनेची पहिल्यापासूनची भूमिका आहे.

नारायण राणे यांच्याबद्दल आता जास्त बोलायची गरज वाटत नाही. राणेंनी आधी जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाचे समर्थन केले आणि आता ते पट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला विरोध करत असल्याचा विरोधाभासही राऊत यांनी पत्रकारांसमोर मांडला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक आणि आमदार राजन साळवी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या