‘वने’ शेऱ्यामुळे ४७ हजार शेतकरी जमिनीविना

सामना ऑनलाईन । मुंबई

रायगड जिह्यातील अनंत आपटे यांची १२ हेक्टरवरील जमीन उदरनिर्वाहासाठी कायद्याने मुक्त झाल्यानंतरही सातबाऱ्यावरील ‘वने’ असे शेऱ्यामुळे त्यांना ही जमीन उपजीविकेसाठी उपलब्ध झाली नाही. असे ४७ हजार ४३२ शेतकरी असून ‘वने’ शेऱ्यामुळे सुमारे ८८ हजार हेक्टर जमीन उपजीविकेसाठी त्यांना उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे हा ‘वने’ शेरा सातबाऱ्यावरून काढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी बुधवारी विधानसभेत केली.

शेतकऱ्यांच्या जमिनींसंदर्भात शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी हरकतीच्या मुद्द्य़ाद्वारे या जमिनी मुक्त करण्याची सरकारकडे मागणी केली. ते म्हणाले, राज्यातील वनांचा विस्तार करण्यासाठी १८७५ साली महाराष्ट्र खासगी वन (संपादन) अधिनियमांतर्गत ८१ हजार ५४६ शेतकरी खातेदारांचे २ लाख ६४ हजार ६३५ हेक्टर एवढे क्षेत्र संपादित करण्याचे प्रस्तावित केले. त्यावेळी लागू झालेल्या आणीबाणीमुळे शेतकऱ्यांना विरोध करता आला नाही. या अधिनियमात १८७८ साली झालेल्या सुधारणेअंतर्गत ४७ हजार ४३२ शेतकऱ्यांना ८८ हजार हेक्टर इतकी जमीन उपजीविकेसाठी उपलब्ध करण्यात आली, मात्र पुनःस्थापित केलेल्या या जमिनीवर सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांनी २२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही ‘वने व इतर’ असा शेरा मारल्याने त्यांना ही जमीन उपजीविकेसाठी राबण्यास मनाई करण्यात येत आहे. त्यामुळे कायद्यानुसार सरकारने या जमिनी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्याव्यात आणि अनंत आपटे यांच्यासह हजारो शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या