एकच खेळ ‘लपाछपी’चा…

गणेश पुराणिक । मुंबई

मराठी चित्रपट म्हटले की सासू, सून, विनोदी, अॅक्शन किंवा मग लव्ह स्टोरी. पण मराठीमध्ये भीतीदायक चित्रपट खुप कमी निर्माण झाले आणि जे झाले ते गुणवत्तेत बॉलिवूड, हॉलिवूडच्या दिमतीलाही न पुरणारे. मात्र नुकताच प्रदर्शित झालेला ‘लपाछपी’ हा चित्रपट सस्पेन्स आणि थ्रीलरने परिपूर्ण असाच आहे. लपाछपी हा मराठीतील हॉरर चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे.

चित्रपटाच्या सुरुवातील तुषार (विक्रम गायकवाड) आणि नेहा (पूजा सावंत) गाडीतून त्यांचा ड्रायव्हर भाऊराव यांच्या गावी जात असतात. तुषारच्या चेहऱ्यावर अपघातानंतरचे किंवा मारझोड झाल्यानंतरचे व्रण दिसत असतात, तर पूजा आठ महिन्याची गरोदर असते. कर्जबाजारीपणामुळे ते भाऊराव (अनिल गावस) यांच्या गावी जाण्याचा निर्णय घेतात.

गाडी गावी पोहचल्यानंतर खरी सुरुवात होती अंगावर शहारे आणणाऱ्या आणि हातातील पॉपकॉर्न खाली पाडू शकतील इतक्या हॉरर चित्रपटाची. चित्रपटासाठी निवडण्यात आलेले लोकेशन आणि संगीत हा चित्रपटाचा आत्मा आहे. चारही बाजूने उसाचा मळा असलेल्या घरात भाऊराव आणि तुळसाबाई (उशा नाईक) राहात असतात. घरात प्रवेश केल्यापासून नेहाला आपल्या आजूबाजूला काहीतरी असल्याची जाणीव होत असते. त्यात तुळसाबाई यांच्या हालचालीवरून तिला शंका येते मात्र तरीही तिथे राहण्याचा निर्णय ती घेते.

नेहा आणि तुषारला काहीही कमी न पडू देण्याचा संकल्प तुळसाबाईने घेतलेला असतो. दोन दिवसांनंतर तुषार काही कामासाठी पुन्हा शहरात (मुंबई) जाण्याचा निर्णय घेतो आणि त्याच वेळी चित्रपटातील हॉरर सिनमधील पात्रांची जी एन्ट्री करून देण्यात आली आहे, ती पाहिल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहात नाही. तुषार गेल्यानंतर नेहाला आपल्या आजूबाजूला लहान मुलांचे भास व्हायला लागतात. आधी एक, मग दोन आणि नंतर तीन. एकामागोमाग एक. थरारक.

उसाच्या मळ्याजवळ सापडलेल्या रेडिओवर वाजणारे ‘एकच खेळ लपाछपीचा… आले आले आले…’ हे गाणे म्हणजे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आणखी एक थरारक कारण.

गरोदरपणी तुळसाबाईने सांगितलेली कहाणी, मळ्यातील विहीर आणि रातकिड्यांचा किर्रर्रर्र आवाज. सगळे कसे एकदम गुढ. नेहाला दिसत असलेली लहान मुले, त्यानंतर लक्ष्मी आणि कावेरीची एन्ट्री, सिनेमातील कॅमेरा आणि संगीत सर्वच भीतीदायक. चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे.

चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे ग्राफिक्सचा अत्यंत कमी आणि मार्मिक वापर. लोकेशन, पात्रांची अचुक निवड आणि संगीत यांची सांगड घालत पडद्यावरील प्रत्येक दृश्यानंतर पुढे काय? हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. चित्रपटात असलेली मुलं, वापरलेला जुना टेप आणि त्याचा आले..आले..आले…! आवाज प्रेक्षकांना वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो. त्यामुळे ती दुनिया अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहायलाच हवा.

विशाल फुरिया, विशाल कपूर यांनी चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली असून दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केलं आहे. तर चंदन कोवली यांनी केलेला कॅमेरा उत्कृष्ट झाला आहे.

सिनेमा का पाहावा –

> चित्रपटातील पात्रांची अचुक निवड

> पुजा सावंत आणि उशा नाईक यांची अभिनयातील जुगलबंदी पाहण्याची उत्तम संधी

> चित्रिकरणासाठी निवडलेले लोकेशन

> अंगावर काटा आणणारे संगीत आणि उत्कृष्ट एडिटींग

> उत्कृष्ट कॅमेरा आणि हॉरर दृश्य