अर्ध्या तिकिटात महिला सुसाट! आठवडाभरात 75 लाख महिलांनी केला एसटीने प्रवास

सध्या गावोगावी धावणाऱया एसटीमध्ये ‘अर्ध्या तिकिटात महिला सुसाट’ असल्याचे चित्र आहे. एसटी महामंडळाने सात दिवसांपूर्वी सुरू केलेल्या ‘महिला सन्मान योजने’ला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सात दिवसांत तब्बल 76 लाख महिलांनी एसटीने प्रवास केला आहे. त्यामुळे महामंडळाला तब्बल 40 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

एसटी महामंडळाच्या राज्यभरात दररोज तेरा हजार बसगाडय़ा धवत असून त्याचा 55 लाखांहून अधिक प्रवासी लाभ घेतात. राज्य सरकारने महिलांसाठी अर्ध्या तिकिटात एसटी प्रवासाची घोषणा केल्यानंतर महामंडळाने त्याची तत्काळ 17 मार्चपासून अंमलबजाणी सुरू केली आहे. त्यानुसार दिवसागणिक एसटीने प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या वाढत असल्याने महामंडळाच्या दैनंदिन व्यवसायात दोन-अडीच कोटी रुपयांची भर पडली आहे. महिलांच्या प्रवासातून महामंडळाला तिकीट विक्रीतून 19 कोटी 78 लाख रुपये मिळाले असून तेवढीच रक्कम सवलतीपोटी राज्य सरकार देणार आहे.

मुंबई प्रादेशिक विभागात सर्वाधिक महिला प्रवासी

एसटी महामंडळाचे राज्यभरात सहा प्रादेशिक विभाग आहेत. त्यामध्ये मुंबई प्रदेशात सर्वाधिक 14 लाख 23 हजार महिलांनी गेल्या सात दिवसांत एसटीने प्रवास केला असून सहा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, तर छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागात 11 लाख 96 हजार महिलांनी एसटीने प्रवास केला असला तरी उत्पन्न मात्र 8 कोटी रुपये एवढे मिळाले आहे.