परीक्षा नाही म्हणजे नाहीच! अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यावर राज्य सरकार ठाम

1727

राज्यातील विद्यापीठातील अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याबाबत पुन्हा एकदा राज्य सरकारने ठाम भूमिका घेतली आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा सध्या घेऊ नये, असा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

राज्यातील विद्यापीठांच्या आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेबाबत निर्णय घेण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्त्कालीन व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर समिती कायम आहे. समितीचा हा निर्णय यूजीसीला कळवण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना दिली.

यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, कोरोना काळात परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम असले तरी, परीक्षा घेण्यात येऊ नये अशी आमची इच्छा नाही. कोरोनाचे संकट टळल्यावर आम्ही परीक्षा घेण्यास तयार आहोत. परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम राहताना एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांबाबत विद्यापींठांचे कुलगुरू सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांना योग्य ते सूत्र वापरून त्यांचा निकाल घोषित करावा आणि पुढे कोविड-19चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परिस्थिती सुधारल्यावर ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला गुण कमी मिळाले आहेत असे वाटते त्यांना परीक्षेची संधी देण्यात येईल.

त्यानंतरच वेळापत्रक जाहीर करा

अंतिम वर्षातील ज्या विद्याथ्र्यांना परीक्षा द्यायची इच्छा असेल तसे त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेऊन त्यांना परीक्षेस बसण्याची संधी देण्यात यावी. अशा विद्याथ्र्यांच्या परीक्षा कोणत्या महिन्यात घेता येऊ शकतील, याची परिस्थिती विचारात घेऊनच पुढील निर्णय घ्यावा. त्याशिवाय हा निर्णय घेताना संबंधित जिल्हाधिकारी तथा आपत्ती निवारण प्राधिकरण यांच्याशी विचारविनिमय करून विद्यापीठांनी निर्णय घेऊन मगच वेळापत्रक जाहीर करण्याची सूचना देण्यात आल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील सर्व 13 अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेणे उचित होणार नाही हे शासनाला लेखी कळवले आहे. त्याचबरोबर पालक आणि शिक्षक यांचा देखील लगेच परीक्षा घेण्यास विरोध आहे.

कोरोना काळात परीक्षा घेणे म्हणजे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे, या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी यूजीसी घेणार का? – उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

  • राज्यासह इतर राज्यांनीदेखील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब, ओडिशा, तामीळनाडू, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, हरयाणा, मेघालय आणि दिल्ली या राज्यांचा समावेश आहे. ज्या राज्यांनी परीक्षा रद्द केल्या आहेत त्या 9 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सुद्धा चर्चा करण्यात येणार आहे.
आपली प्रतिक्रिया द्या