‘मोठी तिची सावली’ आता हिंदीत!

918

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या भगिनी आणि विख्यात संगीतकार मीना मंगेशकर-खडीकर यांचे आत्मवृत्त ‘मोठी तिची सावली’ गेल्या वर्षी प्रकाशित झाले. या पुस्तकाचे वाचकांनी जोरदार स्वागत केले आहे. या पुस्तकाचा हिंदी अनुवाद ‘दीदी और मैं’चे प्रकाशन रविवार, 29 सप्टेंबर रोजी दीदींच्या हस्ते मुंबईत होणार आहे.

‘दीदी और मैं’ या पुस्तकात मीना खडीकर यांनी दीदींच्या उज्ज्वल कारकीर्दीचा समग्र आलेख आपल्या रसाळ शैलीत मांडलाय. दीदींशी निगडित अनेक अविस्मरणीय आठवणी आणि मंगेशकर कुटुंबाची दुर्मिळ छायाचित्रे यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीच्या एका मोठय़ा आणि वैभवशाली कालखंडाचा समग्र दस्तऐवज, असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.

दीदींच्या नव्वदाव्या वाढदिवसाचा योग साधून ‘दीदी और मैं’ प्रकाशित होतेय याचा मला अतिशय आनंद आहे. हे पुस्तक म्हणजे मी दीदीला दिलेली प्रेमाची मौल्यवान भेट आहे. हिंदी अनुवादामुळे आता हे पुस्तक देशपातळीवरील वाचक आणि दीदीच्या चाहत्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास खडीकर यांनी व्यक्त केला.

‘दीदी और मैं’चे प्रकाशन
मंगेशकर भावंडांचे सांगली, पुणे आणि कोल्हापुरातले बालपणीचे दिवस, तो काळ आणि त्यावेळचे सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरण; दीनानाथ मंगेशकरांच्या ‘बलवंत कंपनी’चा सुवर्णकाळ, दीदींचा सुरुवातीच्या दिवसांतला संघर्ष, त्यांना मिळालेली संगीताची तालीम आणि नंतरचे झगझगीत यश-पर्व; तसेच दीदींनी गाऊन अजरामर केलेल्या आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेल्या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मीराबाई, मिर्झा गालिब, भगवद्गीता आणि राजा शिवछत्रपती या ध्वनिमुद्रिकांची माहिती; दीदींचे परदेशी दौरे, तसेच त्यांचे क्रिकेट प्रेम, नाना चौक ते ‘प्रभुकुंज’ हा मंगेशकर कुटुंबाचा प्रवास; दीदींच्या आवडी-निवडी, त्यांचे स्नेही नि सुहृद अशा तपशिलांमुळे हे पुस्तक रसप्रद झालेय.

अमिताभ बच्चन यांची प्रस्तावना
‘दीदी और मैं’ या हिंदी पुस्तकाला बिग बी अमिताभ बच्चन यांची चिंतनपर प्रस्तावना आहे. पत्रकार, साहित्यिक अंबरीश मिश्र यांनी मूळ मराठी पुस्तकाचा हिंदी अनुवाद केला आहे. परचुरे प्रकाशन मंदिरने हा हिंदी अनुवाद प्रकाशित केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या