लतादीदींचा पुन्हा एकदा जन्म व्हावा! हरिप्रसाद चौरसिया यांचे भावोद्गार

मी लतादीदींचा भक्त आहे आणि राहीन.  त्यांच्या प्रेमाने मला खूप काही मिळवून दिले. पृथ्वीवर त्यांची पूजा होते. इतपं सारं अलौकिक आहे. दीदींचा पुन्हा एकदा जन्म व्हावा. मी दर्शन घेईन आणि मग जाईन, असे भावोद्गार ज्येष्ठ बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांनी काढले. निमित्त होते राज्य शासनाच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराचे आणि भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या उद्घाटनाचे!

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आज दीदींच्या नावाने सुरू होणाऱया आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन झाले. प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात आयोजित सोहळय़ात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संगीत महाविद्यालयाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. याच कार्यक्रमात 2020 सालचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांना तर 2021 सालचा पुरस्कार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर उषा मंगेशकर म्हणाल्या, आजवर मला अनेक पुरस्कार मिळाले. माझ्यासाठी दोन पुरस्कार मोठे आहेत. एक माझ्या वडिलांच्या म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाचा आणि दुसरा दीदीच्या नावाचा. दीदींच्या आशीर्वादाने, त्यांच्या सान्निध्यात मी गात राहिले. तिच्या नावाचा हा सर्वोच्च पुरस्कार मला मिळाला.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना इमारतीत सोयीसुविधांनी सज्ज असे संगीत महाविद्यालय सुरू होणार आहे. सध्या तात्पुरता स्वरूपात पु. ल. देशपांडे कला अकादमीत सहा अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.