हा मार्ग मनोहर पर्रीकरांचा नव्हे! भाजपातून विश्वास आणि वचनबद्धता संपली

121

सामना प्रतिनिधी । पणजी

गोवा विधानसभेतील काँग्रेसच्या दहा आमदारांचा भाजप प्रवेश घडवून आणल्याबद्दल दिवंगत माजी मुख्यमंत्री  मनोहर पर्रीकर यांच्या मुलगा उत्पल याने नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर भाजपने दुसरा मार्ग अवलंबला असून पक्षातून आता विश्वास आणि वचनबद्धता यासारखे शब्द संपले आहेत. हा मार्ग मनोहर पर्रीकरांचा नव्हे, अशी खंत व्यक्त करत स्वपक्षावरच टीका केली आहे.

मनोहर पर्रीकर जिवंत असताना विश्वास आणि वचनबद्धता या शब्दांना महत्त्व होते.  ही पक्षाची मूल्ये होती, पण 17 मार्चनंतर दोन्ही शब्द गायब झाले आहेत. पक्षाने भलतीच दिशा पकडली आहे. आता काय योग्य आहे हे केळच सांगेल?, अशा शब्दांत उत्पल पर्रीकर यांनी नाराजी व्यक्त केली. मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्यानंतर गोव्यातील भाजप पूर्णपणे बदलली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

भाजप नेत्यांच्या आशीर्वादासाठी आमदारांना घेऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीत

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आमदारांना घेऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीत पोहचले आहेत. हे सर्व आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, भाजप कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन आशीर्वाद घेणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी राज्य आणि आपल्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी काँग्रेस आमदारांनी हे पाऊल उचलले आहे. कोणत्याही अटीविना ते भाजपमध्ये सहभागी झाले आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी पाऊल – कवळेकर

गोव्यात सत्ता स्थापन करण्याची संधी काँग्रेसला वेळोवेळी चालून आली, मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांत एकता नसल्याने  सरकार स्थापनेचा दावा करू शकलो नाही. गोव्याचा सर्वांगीण विकास हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ज्या दहा आमदारांनी सत्ताधारी पक्षात समावेश केला आहे त्यांच्या विधानसभा क्षेत्रात चांगली विकासकामे होतील, असा विश्वास गोव्याचे माजी विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी व्यक्त केला.

मंत्रिमंडळ पुनर्रचना, कवळेकर उपमुख्यमंत्री

काँग्रेस आमदारांच्या प्रवेशामुळे विधानसभेतील भाजपचे संख्याबळ 27 वर पोहचले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात फार मोठे बदल केले जाण्याची शक्यता असून गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात  येऊन त्यांच्या जागी कवळेकर यांना आता नवे उपमुख्यमंत्री बनवले जाण्याची शक्यता आहे. उपसभापती मायकल लोबो यांची यावेळी मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या 15 पैकी 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने गोव्यात काँग्रेसची अवस्था फारच दयनीय झाली आहे. पक्षाकडे आता केवळ पाच आमदार राहिले आहेत. 40 सदस्यांच्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी किमान 10 आमदारांची आवश्यकता आहे. आता विरोधी पक्षनेते पदही पक्षाला देता येणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या