मुंबईतील ताज्या घडामोडी

महिंद्रा कंपनीच्या महाव्यवस्थापकपदी आशीष महाले

मूळचे वेंगुर्ले येथील असलेले आशीष महाले यांची महिंद्रा अँड महिंद्रा या हिंदुस्थानातील बड्या ऑटोमोबाईल कंपनीच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आशीष महाले यांचे शालेय शिक्षण वेंगुर्ले येथे, तर अभियांत्रिकी शिक्षण सांगली येथे झाले. वेंगुर्ल्यातील जुने व्यापारी आणि ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते पंढरीनाथ महाले यांचे पुत्र तर बांदा येथील गोगटे-वाळके कॉलेजचे प्राध्यापक डॉ. अभिजित महाले यांचे ते बंधू आहेत. आशिष महाले यांनी एक्सेल संशोधनावर आधारित पेंटट मिळवले आहे. कोरोना टाळेबंदी काळात ते कामगार वर्गाच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. तसेच कंपनीच्या विविध यशाच्या टप्प्यावर अनेकदा हजारो कर्मचाऱयांना सोबत घेऊन नरीमन पॉइंटपर्यंत सायकल प्रभात फेरीचे आयोजन केले होते. सामाजिक जाणिवेतून ते नेहमीच वेंगुर्ले तालुक्यातील कोणाही गरजूला मुंबईत तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात प्रयत्नशील असतात.

सीबीआयची भीती दाखवून वृद्धाकडून पैसे उकळले

कुरिअरमध्ये ड्रग असल्याचे भासवत सीबीआय, एनआयए कारवाईची भीती दाखवून ठगाने वृद्धाच्या बँक खात्यावर डल्ला मारला. टेलिग्रामवर बनावट करार पाठवून त्यांना पैसे देण्यास भाग पाडले. फसवणूकप्रकरणी मध्य सायबर पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. मार्च महिन्यात त्यांना एका नंबरवरून पह्न आला. पह्न करणाऱयाने तो कुरिअर पंपनीमधून बोलत असल्याचे भासवले. तुम्ही म्यानमार येथे पाठवलेले कुरिअर रिजेक्ट झाले आहे. तेव्हा आपण कोणतेही कुरिअर पाठवले नसल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. ते पार्सल कस्टम अधिकाऱयाने जप्त केले असून त्यात कपडे, ड्रग आणि पासपोर्ट, लॅपटॉप असल्याचे सांगितले. ठगाने त्यांना आपण कुरिअरबाबत लखनौ येथे तक्रार करावी लागणार असल्याची भीती घातली. पहिल्यांदा लखनौच्या एका पोलीस ठाण्यातून तर नंतर सीबीआय कार्यालयातून अधिकारी बोलत असल्याचे भासवले. पैसे द्या नाहीतर तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला जेलमध्ये टाकू अशी धमकी देत त्यांच्याकडून पैसे उकळले.

सोसायटीच्या अध्यक्षाने घेतला सदस्याच्या अंगठ्याचा चावा

भाडोत्रीच्या वादातून सोसायटीच्या अध्यक्षाने वार्षिक सभेत सदनिका मालकाचा चावा घेऊन अंगठा तोडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमएचबी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. दहिसर पश्चिमच्या म्हात्रे वाडी परिसरात एक इमारत आहे. त्या इमारतीत जखमी सदस्याची सदनिका आहे. त्याने ती सदनिका भाड्याने दिली आहे. त्या सदनिकेत राहणारा भाडोत्री हा रात्री उशिरा येतो. त्यामुळे सोसायटीचा अध्यक्ष त्याला नेहमी टोकतो, असे त्या भाडोत्रीने सदनिकेच्या मालकाला सांगितले. आज सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा होती. त्या सभेत सोसायटीचे एक सदस्य आले. तेथे आल्यावर सदस्याने अध्यक्षाला भाडोत्री बाबत विचारणा केली. तेव्हा त्याच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर मारामारीत झाले. सोसायटीच्या अध्यक्षाने त्या सदस्यांच्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतला. चावा घेतल्याने त्याचा अंगठा खाली पडला. याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. काही वेळात एमएचबी पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी जखमी सदस्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून एमएचबी पोलिसांनी सोसायटीच्या अध्यक्षाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

व्हिडीओ व्हायरलची धमकी देणारा अटकेत

डिलिव्हरी बॉयला त्याच्या पत्नीचे खासगी व्हिडीओ व्हायरलची धमकी देऊन पैसे उकळू पाहणाऱयाला वनराई पोलिसांनी अटक केली. अहमद खान ऊर्फ नूर खान असे त्याचे नाव आहे. तक्रारदार हे गोरेगाव येथे राहत असून ते डिलिव्हरी बॉयचे काम करतात. जुलै महिन्यात ते ऑर्डर घेऊन अंधेरी येथे आले होते. त्याने मोटारसायकलवर मोबाईल ठेवला होता. तो मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरला. मोबाईल चोरीप्रकरणी त्याने अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात त्याना एका नंबरवरून फोन आला. तुझे एक मेमरी कार्ड मला सापडले असल्याचे त्याने सांगितले. त्या मेमरी कार्डमध्ये पत्नीचे काही खासगी व्हिडीओ आहेत असे त्याना सांगितले. जर 1 लाख रुपये न दिल्यास ते व्हिडीओ व्हायरल करेन अशी त्याने धमकी दिली. याप्रकरणी तक्रारदाराने वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अहमदला अटक केली.