मुलीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी गेलेले माता-पिता भीषण अपघातात ठार

लातूर जिल्ह्यातील चाकूर येथून मुलीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी कर्नाटकातील बस्वकल्याण येथे जाणार्‍या कुटुंबाच्या कारला झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. मृतामध्ये लग्न ठरलेल्या मुलीच्या माता-पित्याचा समावेश आहे. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

लातूर – जहिराबाद या राष्ट्रीय महामार्गावर निलंगाच्या पुढे काही अंतरावर असलेल्या एका पुलाजवळ कारचालकाचा कारवरील ताबा सुटला. भरधाव वेगातील कार थेट रस्ता सोडून शेतात कोसळली. या भीषण अपघातात घटनास्थळीच चार जणांचा मृत्यू झाला होता.

चाकूर येथील भगवान मोतीराम सावळे यांच्या मुलीचा विवाह कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील बस्वकल्याण येथील नातेवाईकांमध्ये ठरलेला होता. मुलीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी भगवान सावळे हे कारने बस्वकल्याणकडे निघालेले होते. भरधाव वेगात जाणार्‍या या कारच्या चालकाचा कारवरील ताबा सुटला. कार पलटी होऊन रस्ताशेजारील शेतात पडली. या अपघातात भगवान मोतीराम सावळे (वय 52 वर्षे), लता भगवान सावळे (वय 45 वर्षे), विजयमाला भाऊराव सावळे (वय 54 वर्षे), राजकुमार सुधाकर सावळे (वय 29 वर्षे) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर या अपघातात महेश भगवान सावळे (वय 19 वर्षे), शुभम सुनील सावळे (वय 6 वर्षे) हे जखमी झाले आहेत. या जखमींवर उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे उपचार करण्यात येत आहेत.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर निलंगा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ, उपनिरीक्षक गर्जे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी तसेच स्थानिक नागरिकांनी मदत कार्य केले. घटनास्थळावरील चारही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदानासाठी निलंगा येथील शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आले.