Latur 500 कोटींच्या घोषणा हवेतच विरल्या; नांदेडपाठोपाठ लातूरकरांनाही थापाड्यांनी चुना लावला!

>> अभय मिरजकर, लातूर

थापा मारण्यात तरवेज असलेल्या मिंधे सरकारने नदिडपाठोपाठ लातूरकरांनाही चुना लावला । मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवानिमित्त मराठवाड्याच्या राजधानीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लातूरसाठी ५०० कोटी रुपयांच्या योजना जाहीर करण्यात आल्या. पण वर्षभरात एक पैसाही लातूरकरांपर्यंत आला नाही. यासंदर्भात प्रशासनाने कानावर हात ठेवले आहेत. कोणत्याच विभागाचा अधिकारी बोलायला तयार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राणाभीमदेवी थाटात केलेल्या घोषणा हवेतच विरल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या वर्षी मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. चटावरचे श्राद्ध उरकावे तसे महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ छत्रपती संभाजीनगरात आले. ध्वजारोहणाचा सोपस्कार झाला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषणांची बरसात करण्यात आली. तब्बल ४६ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यात लातूर जिल्हयासाठी ५०० कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या योजनांचा समावेश होता. राजा उदार झाला म्हणून लातूरकरही खूश झाले. पण वर्षभरात एक पैसाही सरकारकडून आला नाही. यासंदर्भात कोणताही अधिकारी बोलण्यास तयार नाही. त्यामुळे हे ५०० कोटी रुपये नेमके गेले कुठे, असा प्रश्न लातूरकरांना पडला आहे.

एकाच रस्त्याची तीनदा घोषणा!

लातूर, बार्शी, टेंभूर्णी या चारपदरी रस्त्याची घोषणा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आली. त्यासाठी किती निधी देणार हे सांगितले नव्हते. विशेष म्हणजे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही याच कामाला दोनदा मंजुरी दिली होती.

घोषणा झाली… पण एक खडकू मिळाला नाही!

उदगीर तालुक्यातील हत्तीबेट पर्यटनस्थळासाठी ५ कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली, हा निधी मिळावा म्हणून वर्षभर सरकार दरबारी खेट्या घातल्या जात आहेत, परंतु अजून एक खडकूही मिळाला नसल्याचे विकास प्रकल्पासाठी काम करणारे व्ही. एस. कुलकर्णी यांनी सांगितले.

निदान मंजूर केलेला निधी तरी द्या!

छत्रपती संभाजीनगरात गेल्या वर्षी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वडवळ नागनाथ येथील संजीवनी बनौषधी बेटाच्या विकासासाठी ५.४२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. एवढा मोठा निधी पहिल्यांदाच जाहीर झाला, परंतु हा आनंद क्षणिकच ठरला. वर्ष उलटले तरी एक पैसाही मिळालेला नाही. निदान मंजूर केलेला निधी तरी देण्याचे सौजन्य सरकारने दाखवावे, असे वढवळ नागनाथचे उपसरपंच बालाजी गंदगे म्हणाले.

लातूरकरांना मारलेल्या थापा

• उदगीर येथील उद्घालिक ऋषीच्या समाधीस्थळासाठी १ कोटी जळकोट येथील क्रीडा संकुलासाठी ५ कोटी उदगीर तालुक्यातील हत्तीबेट पर्यटनस्थळासाठी ५ कोटी वडवळ नागनाथ बेटाच्या विकासासाठी ५.४२ कोटी उदगीर, चाकूर, जळकोट येथे एमआयडीसी मातोळा येथे हुतात्मा स्मारक रस्ते विकासासाठी ४१.३६ कोटी लातूर शहरातील नाट्यगृहासाठी २६.२१ कोटी उदगीरच्या नाट्यगृहासाठी १२ कोटी • अहमदपूर, चाकूर येथे ट्रॉमा केअर सेंटर किनगाव येथे ग्रामीण रुग्णालयासाठी निधी अहमदपूर तालुक्यात मन्याड नदीवर ९ कोल्हापुरी बंधारे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी निधी देवणी गोवंशाच्या संवर्धनासाठी ४ कोटी