वंचितच्या उमेदवाराच्या घोषणेमुळे लातुरात काँग्रेसची वाट बिकट

2386

लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीच्यावतीने नगरसेवक राजा मणियार यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. या उमेदवारीमुळे एकगठ्ठा मुस्लीम समाजाची मते आता काँग्रेसला मिळणार नाहीत. त्यामुळे लातूर शहर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची वाट बिकट असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या विद्यमान आमदारांनी दलीत समाजाच्या मतावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघाकडे केवळ लातूर जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागलेले आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव माजीमंत्री तथा विद्यमान आमदार अमित देशुमख हे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सध्या करीत आहेत. 1995 मध्ये दिवंगत विलासराव देशमुख यांचा पराभव लातूरकरांनी केला होता. त्यामुळे लातुरात काँग्रेस पराभूत होऊ शकत नाही असे चित्र नाही. फक्त उमेदवार टक्कर देणारा असावा अशी लातूरकरांची मानसिकता आहे.

मागील दोन तीन महिन्यांपासूनच आमदार अमित देशमुखांनी मतदारसंघात निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव नगरसेवक असणारे राजा मणियार यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून वंचित आघाडीत प्रवेश घेतला तेव्हा पासून त्यांच्या उमेदवारीची चर्चा लातुरात सुरु होती. मागील निवडणुकीत काँग्रेस आमदारांना केवळ शहर मतदारसंघातील मुस्लीम मतांनी तारलेले होते. आता बहुजन वंचित विकास आघाडीने राजा मणियार यांचीच उमेदवारी घोषीत केली आहे. त्यामुळे लातुरात काँग्रेसची वाट मात्र बिकट झालेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या