लातूर – कोरोना 236 अहवालांपैकी 192 निगेटिव्ह; 16 पॉझिटिव्ह तर 11 अनिर्णित

886

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 4 जुलै 2020 रोजी जिल्ह्यातील एकूण 236 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आलेले होते. त्यापैकी 192 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेला असून 16 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. तर 11 व्यक्तींचा अहवाल अनिर्णित, 25 व्यक्तींचा अहवाल प्रलंबित तर दोन व्यक्तींचा अहवाल रद्द करण्यात आलेला आहे, 3 जुलै रोजी प्रलंबित राहिलेल्या आठ पैकी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर चार जणांचे अहवाल अनिर्णीत आले आहेत. अशी माहिती आरोग्य प्रशासनाच्यावतीने देणार आलेली आहे.

4 जुलै रोजी पॉझिटिव्ह आलेल्या 16 व्यक्ती पैकी 12 व्यक्ती महानगरपालिका हद्दीतील असून त्यातील 10 व्यक्ती एलआयसी कॉलनीतील, एक व्यक्ती खंडोबा गल्ली, एक व्यक्ती बालाजी नगर लातूर येथील आहे. चार व्यक्ती या उदगीर येथील असून त्यातील एक व्यक्ती नेत्रगाव, एक व्यक्ती मोमीनपुरा व दोन व्यक्ती ह्या देगलूर रोड येथील आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी दिली आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील एकूण 73 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते, त्यापैकी 52 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे व एका व्यक्तीचा अहवाल अनिर्णित आला आहे. उर्वरित 17 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित असून 02 व्यक्तिचे स्वब परिपूर्ण न आल्यामुळे त्यांचा अहवाल रद्द करण्यात आला आहे. दिनांक 3 जुलै 2020 रोजी लातूर जिल्ह्यातील 08 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 04 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 04 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकूण 56 कोरोना (कोविड19) पॉझिटिव्ह रुग्ण दाखल आहेत व 05 रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंढे यांनी दिली. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 173, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 242 आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 428 इतकी आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी दिली आहे.

4 जुलै रोजी 13 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यापैकी पाच रुग्ण हे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील तर 3 रुग्ण हे एमआयडीसी मधील कोविड केअर सेंटर येथील असून उर्वरित पाच रुग्ण हे उदगीर तालुक्यातील तोंडार पाटी येथे येथील कोविड केअर सेंटर मधील आहेत, असे एकूण 13 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या