लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आठशे पार, मृतांचा आकडाही 40 वर

2028

लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 800 वर पोहंचली आहे. जिल्ह्यात सध्या 338 रुग्णांवर उपचार सुरू असून 422 रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने घरी परतले आहेत. तर कोरोनामुळे जिल्ह्यातील 40 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 7324 रुग्णांचे स्वॅब तपासणी करण्यात आलेले होते. 14 जुलै रोजी 377 स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 19 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. या 19 रुग्णांमध्ये आनंदनगर दापका ता. निलंगा येथील 3, विक्रम नगर लातूर येथील 2, मोतीनगर लातूर येथील 4, आनंदनगर लातूर 1, नाना-नानी पार्क रोड लातूर 1, गुळखेडा ता. औसा 1, गवळी नगर लातूर 1, भाग्यनगर लातूर 1 संगम ता. देवणी 1, विळेगाव ता. देवणी 2, हत्तेनगर लातूर 1 आणि विशाल लातूर 1 येथील रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील 90 जणांचे अहवाल प्रलंबित असून एकाचा अहवाल रद्द करण्यात आला आहे. 16 जणांचे अहवाल अनिर्णित आले आहेत. निलंगा येथील प्रलंबित असलेल्या 7 अहवालापैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 4 जणांचे अहवाल अनिर्णित आले आहेत.

सलग दुसऱ्या दिवशी 3 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
लातूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांच्या संख्येमुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या होणाऱ्या मृत्यूमुळेही लातूरकरांच्या चिंतेमध्ये भर पडत आहे. सलग दुसऱ्या दिवशी लातुरात 3 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता 40 वर पोहोचलेली आहे.

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लातूर शहरातील राम गल्ली भागातील 70 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निलंगा येथील 65 वर्षीय व्यक्तीचा आणि 52 वर्षीय महिलेचाही कोरोनामुळे लातूरात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या