लातूरमध्ये चाकूचा वार करुन वकीलास लुटले, अज्ञात तिघांविरुध्द गुन्हा दाखल

लातूरातील रेल्वेस्टेशन जाणाऱ्या रस्त्यावर लघूशंका करण्यासाठी थांबलेल्या वकीलास चाकूचा वार करुन तिघांनी लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत लातूर येथे वकीली करणारे बरकत इनायत पठाण (वय 30 वर्षे रा. पठाण नगर, अंबाजोगाईरोड लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, 20 रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी रेल्वेस्टेशन जाणाऱ्या रोडवर लघुशंका करण्यासाठी थांबलेले असताना पाठीमागून मोटारसायकलवर तिघे आले. त्यांनी मोबाईल आणि पैसे दे म्हणून जबरदस्तीने मारहाण केली.

चाकूने कपाळावर दोन्ही बाजूस वार करुन दुखापत केली. फिर्यादीच्या हातामधील 25 हजार रुपयांचा मोबाईल आणि रोख 7 हजार रुपये असणारे पॉकेट ज्यामध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, एटीएम कार्ड अशी कागदपत्रे पळवली.

एकाच्या उजव्या हातावर त्रिशुळ व प्रदिप असे गोंदलेले होते. त्याने आपल्या साथीदारास किरण नावाने हाक मारली होती. तिघेही गाडीवर बसून निघून गेले. मोटारसायकलवर नंबर प्लेटवर मोरया असे लिहीलेले होते. या प्रकरणी अज्ञात तिघांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या