ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार का केला म्हणून महिलेस मारहाण करून विनयभंग

crime

तालुक्यातील हडोळती येथील एका महिलेस तू ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार का केलीस म्हणून एकटी पाहून घरात घुसून तोंड दाबून, शिवीगाळ करून विनयभंग केला व कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार पीडित महिलेने केल्यावरुन पोलीसांनी दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

या तक्रारीत पिडीतेने नमुद केले आहे की, 3 मार्च 2021 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास माझे मालक जांब ता.मुखेड येथील पेट्रोल पंपावर सुरक्षा गार्ड म्हणून ड्युटीवर गेले होते. मुलगा अभिजित पवार घराबाहेर रोडवर गेला होता. घरी मी एकटीच होते. यावेळी आमचे घराशेजारी नरसिंग देविदास पवार, अंतेश्वर ज्ञानोबा पवार हे मोटारसायकल वरून घरासमोर आले. मी घरी एकटीच पाहून वाईट हेतूने घरात घुसून तू ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार का केलीस असे म्हणून मला शिवीगाळ करू लागले. त्यावेळी नरसिंग पवार हा माझे तोंड दाबून पदराला धरून ओढू लागला. नरसिंग पवार आणि अंतेश्वर पवार यांनी विनयभंग केला. मी आरडाओरड करीत असताना तुला खल्लास करतो ओरडू नको आवाज बंद कर म्हणून वाईट शिवीगाळ करू लागले. तेवढ्यात माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून माझा मुलगा अभिजित पवार व माझा भाया बाबुराव पवार पळतच घरी आल्याचे पाहून दोघेजण घरातून निघून जात असताना पोलिसात तक्रार दिली तर तुझ्या कुटुंबाला खतम करतो, अशी धमकी देऊन ते त्यांच्या मोटारसायकलवरून निघून गेले. या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात नरसिंग देविदास पवार, अंतेश्वर ज्ञानोबा पवार या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या